या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




१०

चौथ्या दशांशाची दक्षता !






 १८७० साली सप्टेंबर महिन्यात फ्रान्सच्या उत्तरपूर्वेस असलेल्या सेडान या गावाजवळ जर्मनी व फ्रान्स या दोन देशांमध्ये अत्यंत घनघोर असा संग्राम झाला. या संग्रामात फ्रान्सच्या सर्व सेना धुळीस मिळून त्या राष्ट्राचा अगदी निःपात झाला. या प्रबळ अशा राष्ट्राची अशी अवस्था का झाली हे पाहणे फार उद्बोधक होईल असे वाटते.
 १४ जुलैला फ्रेंच सेना पॅरिसहून निघाल्या तेव्हा त्यांचा उत्साह काही अपूर्वच होता. सैनिकांच्या तोंडून निघणाऱ्या 'चलो बर्लिन, चलो बर्लिन' या घोषणांनी आकाश कोंदून गेले होते. सेनानींनाही आत्मविश्वास होता आणि आपण बर्लिनचा पाडाव करून जर्मनीला जमीनदोस्त करू याबद्दल कोणालाच शंका नव्हती. बादशहा तिसरा नेपोलियन मोठ्या दिमाखाने आघाडीकडे निघाला. 'आपण तेथे पोचण्याच्या आधीच मेट्झच्या छावणीवर आम्ही ४ लक्ष सैन्य जय्यत तयार ठेवतो,' असे त्याच्या सेनापतींनी त्याला आश्वासन दिले होते.
 पण बादशहा मेट्झला येऊन पोचला तेव्हा तळावर दोन लक्षच फौज आलेली त्याला दिसली. यामुळे तो संतापला. पण संताप तसाच गिळून आलेल्या सेनेची व्यवस्था तरी नीट आहे ना हे पाहण्यासाठी तो शामियान्यातून बाहेर पडला. सगळ्या छावणीभर फेरी झाली, तरी सैन्याच्या रोटीची व्यवस्था त्याला कोठेच दिसली नाही, म्हणून त्याने चौकशी केली. कोठीच्या अधिकाऱ्याने घाबरत घाबरत येऊन सांगितले की, दाणागोटा आहे पण तो वीस मैलांवर आहे. 'आताच्या आता दोन तासात 'शिदोरी' येथे आणवा,' असे बादशहाने वाहतूक अधिकाऱ्यास सांगितले. थोड्या वेळाने परत येऊन त्याने सांगितले की,