हे पान प्रमाणित केलेले आहे.

सरस्वतीची हेळसांड  

त्यामुळे राजनीती, युद्ध, व्यवहारनीती, समाजरचना या शास्त्रांचा येथे विकासच झाला नाही. न्यूटनचा सिद्धान्त त्याने लिहून ठेवला नसता आणि प्रत्येक विद्यार्थ्याला तो स्वतंत्रपणे शोधून काढावा लागला असता, तर वस्तुशास्त्राची जी प्रगती शक्य झाली असती तितकीच प्रगती येथे समाजशास्त्राची झाली. कारण येथे पित्याने आपले सिद्धान्त लिहून ठेविले नाहीत, पुत्राला शिकविले नाहीत.
 रजपुतांनी जवळजवळ आठशे वर्षे मुसलमानांशी संग्राम केला. तेवढ्या अवधीत त्या भूमीतल्या पुरुषांना लक्षावधी अनुभव आले असतील. मुसलमानांची कडवी धर्मनिष्ठा, त्यांची युद्धनीती, आपली युद्धपद्धती, किल्ल्यांचे महत्त्व, बचावाचे धोरण, चढाईचे धोरण, शरण आलेल्यास अभयदान, जोहार, यवनांची कपटनीती, रणात सर्वांनी आत्मबलिदान करणे, या आणि यांसारख्या असंख्य सामाजिक व राजकीय विषयांवर कितीतरी विचार रजपूत पुरुषांनी केला असेल. पण प्रत्येकाचा विचार ज्याचा त्याच्याबरोबर गेल्याने आठशे वर्षांच्या अखेरीस पुन्हा सर्व धोरण पहिल्यासारखेच ! ज्ञानाचा संचय, वाढ व विकास व त्यामुळे निर्माण होणारे नवे तत्त्वज्ञान यांचा येथे ठावठिकाणाच नाही. त्यामुळे येथल्या घडामोडी या निसर्गातील वायू, वीज, अग्नी यासारख्या अंधशक्तीच्या संघर्षासारख्याच बहुतांशी भासू लागतात. पिढ्या न् पिढ्या डोळसपणे लोक मार्ग आक्रमीत आहेत असे दिसत नाही.

युरोपीयांतील आणि आमच्यांतील फरक

 ड्यूक ऑफ वेलिंग्टन हा त्या मोठ्या पदवीस जाण्यापूर्वी हिंदुस्थानात प्रसिद्धीस आला होता. येथेही प्रसिद्धी मिळण्यापूर्वीच एकदा त्याने मद्रासहून बंगलोरपर्यंत प्रवास केला होता. पण हा प्रवासही त्याने फुकट घालविला नाही. या प्रवासात असताना टिपणे करून ठेवून परत आल्यानंतर या सर्व प्रदेशाच्या भूपृष्ठाची युद्धदृष्टीने त्याने माहिती लिहून काढली व ती पुस्तकरूपाने राजकर्त्यांच्या हवाली केली. पुढे त्याला व इतर सेनापतींना तिचा उपयोग किती झाला असेल हे सांगावयास पाहिजे असे नाही. आणि हे धोरण एकट्या वेलिंग्टनचेच होते असे नाही. इंग्रजांचा प्रत्येक गव्हर्नर, प्रत्येक सेनापती, प्रत्येक मुत्सद्दी आपले अनुभव असे लेखनिविष्ट करीत आलेला आहे. मराठे लोक कसे आहेत, त्यांचा पराक्रम काय, युद्धपद्धती कोणत्या, त्यांच्या निष्ठा कोणत्या, त्यांची आपसात फूट कशी आहे,