हे पान प्रमाणित केलेले आहे.

 २६ माझे चिंतन

 आज या योजना आखताना त्या योजकांच्या मनात हेतू स्पष्ट असतो. तो वर्तमानपत्रांतून जाहीर झालेला असतो. त्यावर व्याख्याने करविलेली असतात. असे असूनही त्यांचा व्यवहार होताना हेतू व कृती यांचा संबंध स्पष्ट राहात नाही. हेतूचा विसर पडतो, विपर्यास होतो व कृती अर्थशून्य होऊन त्यांना धार्मिक विधीचे व कर्मकांडाचे रूप येते. मग कालांतराने काय होईल यांची सहज कल्पना करता येईल. शेंडी, घेरा, गंध, स्नानसंध्येच्या वेळचे हातवारे, या जुन्या कसरती आहेत, त्याचप्रमाणे आरोग्यसप्ताहातील स्वच्छता, वनमहोत्सवातील वृक्षारोपण, गांधी सप्ताहातील सूतकताई, बी. टी. कॉलेजमधील शिक्षकांचे पाठ, अन्नधान्य मोहिमेतील विहिरी खणणे, बांध घालणे, खते टाकणे, ग्रामविकास योजनेतील चरांचे संडास, खतांचे खड्डे, यांना कसरतीचे स्वरूप येईल. आणि राष्ट्रद्रोहाची इतर कृत्ये कितीही केली तरी सूतकताई, खतांचे खड्डे, वृक्षारोपण, चरांचे संडास यांकडे बोट दाखवून त्यावेळचे नागरिक आपण पूर्ण राष्ट्रनिष्ठ असल्याची ग्वाही देतील. राष्ट्रधर्म तो हाच अशीच त्यांची श्रद्धा होईल. मग पाकिस्तानाशी संगनमत करणे, पोलिशी राज्य प्रस्थापित करणे, जातीयता पेटवून तिच्या आधारे अधिकारारूढ होणे, घटनेचा दरक्षणी उपमर्द करणे यांसारखी पातके करूनही आपण राष्ट्राशी किंवा लोकशाहीच्या तत्त्वाशी द्रोह केला असे त्यांच्या स्वप्नातही येणार नाही. त्यांच्यावर तसा कोणी आरोप केला, तर ते मिर्झा राजांप्रमाणे विस्मित होतील. कारण राष्ट्रनिष्ठा, लोकशाही यांचे तोपर्यंत सांगाडे बनलेले असतील आणि तेच त्यांचे उच्चरूप अशी श्रद्धा त्यांच्या मनात दृढ होऊन जाईल. मग धर्माप्रमाणेच राष्ट्रनिष्ठा, लोकसत्ता यांची विटंबना होईल. आज होतच आहे. पण ती स्वार्थी हेतूने, दुष्टपणाने होत आहे. पुढे श्रद्धेने, भाविकपणाने होऊ लागेल; कारण तेच राष्ट्रधर्माचे रूप, तोच उच्च राष्ट्रधर्म, तीच खरी लोकसत्ता असा भोळा भाव लोकांच्या मनात दृढ होईल.
 जुने धर्मशास्त्र व अर्वाचीन मार्क्सवाद यांच्या प्रवर्तकांनी एक गोष्ट गृहीत धरलेली आहे. एकदा समाजाला काही व्यवस्था लावून दिली, की ती कायम टिकते, तसा तिच्यात स्वयंभू गुण असतो, असा त्यांचा समज आहे. हा समज अगदी भ्रामक आहे. मानव हा चल घटक आहे. तो घोटीव नियमात कधीही बसत नाही; त्यामुळे वर सांगितल्याप्रमाणे दरवेळी त्या त्या काळी प्रवर्तित केलेल्या धर्मतत्त्वातील आत्मा कालांतराने नष्ट होतो, व त्याला जडरूप येते. म्हणून ही गृहीत गोष्ट