पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/120

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नसण्यातच त्याचे असणे सामावलेले असते हे मला त्यांचे पूर्वचरित्र, घडण समजावून घेताना हळूहळू लक्षात येऊ लागले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला कृतज्ञतेची जी झालर नि झळाळी होती, त्यामागे पूर्वायुष्याचं वंचितपणाचं ओरखडणारं संचित अविस्मरणीय तसंच खदखदत ठेवणारं होतं.
 भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात या देशातील गरिबातील गरीब माणसाला जर कोणत्या जाणिवेने बेचैन केले असेल तर ती हीच की पोरं शिकली पाहिजेत. प्रजासत्ताक भारतानंतरच्या काळाने अशिक्षित माणसाला शिक्षणाबद्दल अधिक आस्था वाटू लागली ती वाडीवस्तीपर्यंत पोहोचलेल्या साक्षरता प्रसाराच्या लोणामुळे. यात आणखी एक गोष्ट होती की दुर्गम भागात ही जाणीव अधिक तीव्र असायची. त्यामुळे ‘ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा' ही घोषवाक्ये सन १९५०-६० च्या दरम्यान सर्वत्र आढळत. शाळा प्रभातफेच्या काढून गल्लीबोळांतून ‘मुला-मुलींना शाळेत पाठवा' म्हणून घोषणा देत गावंच्या गावं जागी करीत. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील ‘मूर्तीचे वरकुटे' हे छोटं गाव. त्या गावाला गाव म्हणण्यापेक्षा यादव वस्ती' म्हणणं अधिक योग्य व्हावं. पाचपन्नास उंब-यांच्या गावाला त्या वेळी वाडी, वस्ती म्हणूनच ओळखलं जायचं. यशवंतराव यादव अशा वस्तीतील एक गरीब शेतकरी. पती-पत्नी दोघे अशिक्षित. पूर्वापर असा कोणताच शिक्षणाचा दिवा त्यांच्याच घरी नाही तर आख्ख्या वस्तीत पेटलेला नव्हता. पदरची मुले-मुली अशिक्षित असली तरी त्यांना शाळेला घालण्याचा शहाणपणा यशवंतराव यादव यांनी दाखविला आणि आपल्या आठ वर्षांच्या बबनला वस्तीतील लोकल बोर्डाच्या शाळेत घातलं. त्या वेळी या शाळा व्हॉलंटरी स्कूल, व्हर्नाक्यूलर स्कूल म्हणून ओळखल्या जायच्या. बबन स्वत:च्या जिद्द नि। प्रयत्नांनी इथं इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शिकत राहिला. हा काळ साधारण १९५४-५५ चा असावा.
 वरकुटे वस्तीतील शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचेच वर्ग होते. जवळ चार-पाच किलोमीटर अंतरावर नेरले नावाचे वरकुट्यापेक्षा मोठे गाव होते. शिवाय रहदारीच्या रस्त्यावर असल्याने तिथे सातवीपर्यंतची शाळा होती. कांबळे गुरुजी, पोतदार गुरुजी, माळी गुरुजी असा उत्साही शिक्षकांचा मेळा शाळेस लाभल्याने ते पंचक्रोशीतील मुले निवडून गोळा करीत व आदर्श शाळा चालवित. बबनचा शोध चौथीच्या केंद्र परीक्षेतून लागला. बबन येता-जाता रोज दहा किलोमीटरची पायपीट करीत इथे इयत्ता पाचवी ते सातवीपर्यंत शिकला. शिक्षकांचे व्यक्तिगत प्रेम, लक्ष, प्रोत्साहन यांमुळे बबन इथेही चांगल्या मार्कोनी उत्तीर्ण झाल्याने वरकुटे गावच्या शिक्षकांप्रमाणे इथल्या


माझे सांगाती/११९