पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/38

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

केशवराव जगदाळे स्वतः अल्पशिक्षित होते; पण शिक्षणाबद्दल त्यांना प्रचंड आस्था होती. बहुजन वर्गात शिक्षणप्रसार व्हावा म्हणून त्यांनी स्कूल बोर्डमार्फत शहरात अनेक शाळा सुरू केल्या. त्यात सिद्धार्थनगरसारख्या मागासवर्गीय वसाहतीत त्यांनी शाळा सुरू करून आपलं पुरोगामीपण सिद्ध केलं. कोल्हापुरात ब्रॉडगेज सुरू करणे, इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज सुरू करण्याचे पहिले प्रयत्न, मागण्यांमध्ये केशवराव जगदाळे यांचा पुढाकार होता. कोल्हापूरच्या विकासाच्या पहिल्या मास्टर प्लॅन (कपूर प्लॅन) च्या राबवणुकीत जन विरोध शमवत रस्ते रुंदीकरण होताना जनसामान्यांना भरपाईची घसघशीत किंमत मिळावी म्हणून आग्रह धरण्यात केशवराव जगदाळे आघाडीवर असायचे. अंबाबाईच्या देवळाभोवतीचा रस्ता (जोतिबा रोड) बोळ होता, तो रुंद केला, मोटारीतूनही अंबाबाईला प्रदक्षिणा घालता यावी म्हणून. या सरंजामी विकासाच्या ते विरोधी होते. श्रीमंतांना सोई करण्यापेक्षा गरिबांना विकासाचा वाटा मिळावा म्हणून ते शेवटपर्यंत जनसामान्यांचे सामाजिक वकील म्हणून पुढाकार घेत राहिले.

 केशवराव जगदाळे यांनी भारत छोडो आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र लढा, गोवा मुक्ती संग्राम अशा अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतल्याने कधी लाठीमाराचा प्रसाद, कधी अटक, कधी तुरुंगवास अशा दिव्यातून आपल्यातील कार्यकर्ता घडविला. भारताच्या स्वातंत्र्यानंतर व स्वतंत्र महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर त्यांनी स्वत:ला विकासकार्यात झोकून दिलं. शहरातील शिक्षण, आरोग्य, रस्ते, दवाखाने अशा मूलभूत सोयी करण्यात त्यांनी आपलं आयुष्य वेचलं. सार्वजनिक संडासबांधणी, (त्या वेळी घरोघरी संडास नसत.) सार्वजनिक नळांची गल्लोगल्ली निर्मिती, प्रत्येक पेठेत पाण्याचे हौद सार्वजनिक बांधणे, शाळांच्या इमारती, दवाखाने उभारणे, मैदाने करणे अशी अनेक कामे त्यांच्या पुढाकारातून उभारली. कोंबड्यांच्या झुंजी, रेड्यांच्या टकरी, बैलगाडी शर्यती, कुस्त्यांची मैदाने (फड), तमाशा, लोकनाट्य, शाहिरी कार्यक्रम, रणजी ट्रॉफीचे क्रिकेट सामने भरविण्यातून त्यांनी लोकनिधी उभारला. त्यातून अनाथ महिलाश्रम, रिमांड होम, विद्यापीठ, इत्यादी संस्थांना त्यांनी अर्थसाहाय्य मिळवून दिल्याचा मी साक्षीदार आहे. सन १९६५ च्या दरम्यान स्वातंत्र्य मिळूनही लोक उपाशी राहतात. माणशी १२ किलो धान्य मिळालं पाहिजे, चहा स्वस्त झाला पाहिजे आणि (मटणाचे दर उतरले पाहिजेत म्हणून) जी आंदोलने झाली त्यात गोळीबार, अटकसत्र झाले. जनसामान्यांचा आक्रोश बुलंद आवाजात शासनाच्या कानांपर्यंत पोहोचविणारा हा झुंजार कार्यकर्ता. त्यांनी आयुष्यात कधी कच खाल्ली नाही. पुढे वयपरत्वे दृष्टी अधू झाली, तेव्हा गॉगल ही त्यांची ओळख

माझे सांगाती/३७