पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२३५

हे पान प्रमाणित केलेले आहे.

देणे आहे फक्त ३३ हजार कोटी रुपयांचे. म्हणजे शेतकरी सरकारला एक पैसाही देणे लागत नाहीत. उलट, सरकारकडूनच शेतकऱ्यांचे २ लाख ६७ हजार कोटी रुपये येणे आहे. ज्यांना कोणाला युक्तिवाद करायचा असेल त्यांनी सगळे कागदपत्र सोबत घेऊन समोरासमोर यावे. नेहरू शेतकऱ्यांचे गुन्हेगार होते, त्यांची सगळी वंशावळ शेतकऱ्यांची गुन्हेगार आहे हे कागदोपत्री सिद्ध होईल.
 मग, जो काही देणे लागतच नाही त्याने काही दिले नाही तर पाप कसले लागायचे? एखाद्या सावकाराकडून काहीच घेतले नसेल किंवा काही कर्ज घेतले होते पण त्याच्यापेक्षा जास्त परतफेड केली असेल तरीही तो मागणी करतो आहे म्हणून जर तुम्ही पैसे दिले तर तुम्ही पापी माणसाला उत्तेजन दिल्यासारखे होईल आणि तुम्हीच गुन्हेगार ठराल.
 म्हणून, तुम्ही कर्जात आहात याचा अभिमान बाळगायला लागा. कारण, तुम्ही प्रामाणिक आहात म्हणून तुम्ही कर्जात आहात. तुम्ही कर्जात आहात हा तुमच्या प्रामाणिकपणाचा पुरावा आहे.
 या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर एक मोठा बदल झाला. एके काळी उत्कृष्ट शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी अशी स्थिती होती. स्वातंत्र्यानंतर आता नोकरी सर्वश्रेष्ठ झाली असून आता मोठमोठे शेतकरी आपली दोन-तीन, तीनतीन एकर शेती विकून अगदी चपराश्याच्या नोकरीसाठी धावपळ करतात. स्वातंत्र्यानंतर काळ्या इंग्रजांच्या राजवटीमध्ये शेती अशा तऱ्हेने बुडवण्यात आली की शेतकरी कितीही कष्ट करीत असला तरी तो तोट्यात जातो, काहीही पीक घेतले तरी तो कर्जात जातो; पण त्याच्या घरचा एक भाऊ जर शाळामास्तर असेल तर त्याचे घर नीट चालते. ही उलटी गती स्वातंत्र्यानंतर समाजवादाच्या नावाखाली नेहरू घराण्याने आणली.
 शेतकरी संघटनेने अनेक आंदोलने केली. पहिल्यांदा कांद्याचे आंदोलन केले मग उसाचे, नंतर तंबाखूचे, दुधाचे, कापसाचे अशी आंदोलने केली. त्या वेळी एका पत्रकाराने प्रश्न विचारला की, 'हे तुमचे असे किती दिवस चालणार? एका मागोमाग दुसरं पीक?' पहिल्या बाजीरावाचे वाक्य होते की, दिल्लीच्या बादशहावर हल्ला करायचा असेल तर फांद्या तोडत बसू नका मुळावर घाव घाला. तेव्हाआता मुळावर घाव घालायचा काही कार्यक्रम काढा."
  मग एका बैठकीत विचारविनिमय चालू असताना लक्षात आले की, सगळेच शेतकरी- कोणी ऊस पिकवतो, कोणी कांदा, कोणी कापूस, कोणी ज्वारी, तर कोणी तंबाखू, कोणी भात, तर कोणी गहू पिकवतो. आणखी काय काय; पण ही

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २३५