पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२४२

हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहे की, "तुम्ही पहिल्यांदाच आंदोलनाला उतरत आहात, तुमच्या मदतीला येणे हे माझे कर्तव्य आहे. त्यात, आपण शेतकऱ्यांचे कैवारी आहोत असे म्हणणाऱ्या कम्युनिस्टांची सत्ता तुमच्या राज्यात आहे, त्यांचा 'शेतकरी कैवारा'चा बुरखा फाडणे आवश्यक आहे म्हणूनही तुमच्या मदतीला येणे हे माझे कर्तव्य आहे." त्याहीपलीकडे, आपण तिरुपतीला जसे मोठ्या संख्येने गेलो होतो त्याच प्रकारे किमान २० हजार शेतकरी स्त्रीपुरुष पाईक शेतकरी संघटनेचा झेंडा घेऊन केरळातील आयाबहिणींच्या या आंदोलनाला येतील असेही आश्वासन मी त्यांना दिले आहे.
 अफजलखान समोरासमोर असतानाही, शिवाजी महाराजांची एक फौज कोकणात गेली तसेच उसाच्या अफजलखानाशी सामना असताना आपलीही एक फौज केरळात जाणे आवश्यक आहे. कम्युनिस्टांची, त्यांना शेतीचे अर्थशास्त्र कळते ही वल्गना, वल्गनाच आहे हे सिद्ध करून त्यांचे पितळ उघडे पाडण्याची ही संधी आहे.
 दुसरी लढाईची आघाडी आहे, SEZ म्हणजे 'विशेष आर्थिक विभागा'च्या (Special Economic Zones) संबंधात. आठवड्यापूर्वी औरंगाबाद परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन करून, त्यांना किरकोळ नुकसानभरपाई (भाव) देऊन ती SEZ उभारण्यासाठी विकासक उद्योगपतींच्या हवाली करण्याचे कारस्थान उभे राहत होते. स्पेशल इकॉनॉमिक झोनच्या नावाने एक नवा राक्षस भारतातल्या शेतकऱ्यांच्या मागे लागला आहे. स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणजे कारखानदारांचे कौतुक करणे, त्यांना सर्व काही सोयीसवलती देणे, त्यांना सर्व ते स्वातंत्र्य देणे आणि त्यांना जागतिक बाजारपेठेतील स्पर्धेकरिता तयार करणे. हे तर शेतकरी संघटनेचे तंत्र आहे. स्पेशल इकॉनॉमिक झोनला शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे. राज्यसभेमध्ये स्पेशल इकॉनॉमिक झोनबद्दल मी बोललो आहे; पण कारखानदारांना सर्व तऱ्हेच्या सूटसवलती आणि स्वातंत्र्य देत असताना ज्यांच्या जमिनी त्यासाठी घेतल्या जाणार आहेत त्या जमिनीमात्र शेतकऱ्यांच्या बाबतीत जमीन संपादन करण्याच्या कायद्याखाली संपादन करायच्या आणि कारखानदारांकडून त्या जमिनीची जी किंमत घ्यायची त्याच्या १ टक्क्यापेक्षाही कमी रक्कम शेतकऱ्यांच्या तोंडावर फेकायची हा अन्याय चालणार नाही. मी औरंगाबादच्या शेतकऱ्यांना एक आश्वासन आणि एक सूत्र दिले आहे आणि हे सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनीही लक्षात घेतले पाहिजे. कारण ही स्पेशल इकॉनॉमिक झोनची धाड सगळ्या जिल्ह्यांवर येणार आहे. आपले सूत्र असे :
 १) ज्यांना शेती करीत राहण्याची इच्छा आहे त्यांची जमीन कोणालाही

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २४२