पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२४३

हे पान प्रमाणित केलेले आहे.

काढून घेता येणार नाही.
 २) ज्यांना आता शेती करणे नको असे कोणत्याही कारणाने वाटत असेल - कर्ज वाढते म्हणून वाटत असेल, जागतिक बाजारपेठेच्या स्पर्धेत टिकाव धरता येणार नाही असे वाटून वाटत असेल किंवा जैविक तंत्रज्ञानातील बियाणे घेऊन शेती कशी करावी या चिंतेने वाटत असेल – अगदी टोकाला जाऊन शेती करण्यापेक्षा आत्महत्या हा एकच पर्याय राहिला आहे असे वाटत असेल त्यांना शेती सोडण्याचा हक्क मिळाला पाहिजे आणि हा शेती सोडण्याचा हक्क बजावताना त्यांनी कोणाला जमीन विकायची आणि केवढ्या भावाने विकायची हे सांगण्याचा सरकारला काहीही अधिकार नाही. (पंधरवड्यापूर्वी पुण्याजवळच्या पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, 'मी सरकारला आता सांगणार आहे की पुण्याच्या जवळच्या जमिनी घेणे आता तुम्ही बंद करा; शेतकऱ्यांना काय भूमिहीन करून टाकायचे का?' आहे की नाही गंमत?)
 तेव्हा, ज्याला शेती करीत राहण्याची इच्छा आहे त्याची जमीन कोणालाही घेता येणार नाही आणि ज्याची शेतीतून बाहेर पडण्याची इच्छा आहे तो आपली जमीन ज्याला पाहिजे त्याला आणि पाहिजे त्या किमतीत विकेल. कोणाला जर का स्पेशल इकॉनॉमिक झोनकरिता जमीन हवी असेल तर ती जमीन त्याला शेतकऱ्याला बाजारात जो जास्तीत जास्त भाव मिळत असेल त्यापेक्षा वरची बोली करून घ्यावी लागेल. औरंगाबादला शेतकऱ्यांचा खूप मोठा मोर्चा निघाला, त्याचा घाव त्या व्यवहारातील लोण्याच्या गोळ्यावर टपलेल्या बोक्यांच्या वर्मी बसला, सत्तरऐंशी शेतकऱ्यांना रात्री उशिरापर्यंत तुरुंगात डांबले; पण ४८ तास उलटायच्या आत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आदेश दिले आहेत की 'शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेण्याचे थांबवा.' म्हणजे आपला विजय आधीच झाला आहे. तरीही या विषयातही सतत सजग राहिले पाहिजे.
 आता मी उसाच्या प्रश्नाकडे वळतो. उसाच्या फक्त भावासंबंधी बोलून पुरायचे नाही. मी १९८० सालापासून ठिकठिकाणी म्हटले आहे की केवळ सहकारी साखरसम्राटच नव्हे तर सहकारातील सगळेच नेते हे शेतकऱ्याच्या जिवावर उठले आहेत आणि शेतकऱ्यांना खड्ड्यात घातल्याशिवाय त्यांना पुढारीपण मिळत नाही म्हणून त्यांची ही सर्व खटपट चालू असते. माझे हे म्हणणे पटवून देण्यासाठी मी वेगळी वेगळी उदाहरणे दिली. १९८० साली माधवराव बोरस्ते, माधवराव मोरे यांच्यासारख्या मातबर शेतकऱ्यांसमोर मी सहकारातील पुढाऱ्यांच्या शेतकऱ्यांना लुटण्याच्या युक्त्या सांगितल्या. माधवराव बोरस्ते साखर संघाचे

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २४३