पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२७३

हे पान प्रमाणित केलेले आहे.

पाहिजे. एका शेतकऱ्याची कर्जमुक्ती करा अशी मागणी आम्ही केली नाही, छोट्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा अशीही मागणी आम्ही केली नाही; आम्ही सर्व शेतकऱ्यांना सर्व कर्जातून मुक्तीची मागणी केली. कारण, शेती हा तोट्याचा व्यवसाय आहे हे निश्चित झाल्यानंतर तुमची जमीन पन्नास एकर असो की पाच एकर असो तोटा त्या त्या प्रमाणात होणार आणि परिणामी तो शेतकरी कर्जातच राहणार.
 कर्जमाफीचे थोतांड
 सरकारने २९ फेब्रुवारी २००८ रोजी एक 'कर्जमाफी व सूट सवलत' योजना जाहीर केली. त्याची घोषणा करताना त्यांनी अनेक युक्त्या केल्या. आपण आपले 'मायबाप' सरकार म्हणतो त्या सरकारने ज्याप्रमाणे शेतीमालाला भाव मिळू नये म्हणून सरकारने अधिक पैसे मोजून पाकिस्तानाकडून गहू आणला, अमेरिकेकडून गहू आणला त्याचप्रमाणे शेतकऱ्याशेतकऱ्यांत फूट पाडावी म्हणून 'कर्जमाफी व सूट सवलत' योजना जाहीर करताना वेगवेगळ्या युक्त्या लढवल्या.
 सगळ्या शेतकऱ्यांची कर्जे माफ नाहीत; ज्यांची जमीन ५ एकरापेक्षा कमी आहे त्यांची कर्जे माफ होणार. सगळे शेतकरी जे शेतावर किंवा गावात राहतात त्या सगळ्यांना माहीत आहे की आजोबांनी त्यांची जमीन त्यांच्या मुलांत सारखी वाटली, नंतर आपल्या वडिलांनी सर्व मुलांत जमीन सारखी वाटली असे होता होता आधीची पन्नासशंभर एकरांवरची जमीनसुद्धा नातवंडां-पतवंडापर्यंत येईतो दोन-पाच एकरांची होऊन जाते. तेव्हा जमिनीचा तुकडा लहान आहे म्हणून तो जास्त गरीब आहे असा होत नाही. एखाद्याची जमीनधारणा लहान आहे याचा अर्थ एवढाच होतो की त्याच्या बापाने, आजोबाने, पणजोबाने जमिनीची वाटणी केली आहे आणि जर का एखाद्याच्या घरी अशी जमिनीची वाटणी झाली नसली तर अजूनही त्याच्या घरी पन्नास शंभर एकर जमीन आहे; सगळी भावंडे एकत्रितपणे गुण्यागोविंदाने नांदत शेती करत आहेत. म्हणजे, जर का भावाभावांत भांडण झाले नसेल आणि म्हणून वाटणी झाली नसेल, तर त्यांना कर्जमाफी नाही आणि भावाभावांमध्ये भांडण होऊन वाटणी झाली असेल तर मात्र त्यांची कर्जे माफ होणार. तेव्हा शेतकऱ्याशेतकऱ्यांतच नव्हे तर शेतकऱ्यांच्या घरात भांडणे लावण्याची ही कर्जमाफी योजनेची युक्ती.
 व्यापारी बँकांकडून घेतलेल्या कर्जाची माफी होऊ शकते, सहकारी बँकांकडून घेतलेल्या कर्जाची माफी होऊ शकते, पण खासगी सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची माफी होणार नाही. शेतकरी आधी सोसायटीतून कर्ज घेतो किंवा व्यापारी बँकेकडून कर्ज घेतो आणि ते फेडायची वेळ आली म्हणजे मालाच्या किमतीतून

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २७३