पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२८०

हे पान प्रमाणित केलेले आहे.

भूक जाणवू द्या म्हणजे अन्नधान्याचा तुटवडा हे राष्ट्रीय संकट आहे हे तुम्हाला कळेल. त्यांनी अन्नधान्याचे उत्पादन वाढेल एवढीच व्यवस्था नाही केली, तर लोकांना उपवास करायला सांगितला. एवढा त्यांचा नैतिक अधिकार होता आणि त्यांच्यात तेवढे धैर्यही होते. सोनियाजींच्या ताटाखालचे मांजर असलेल्या मनमोहन सिंगांकडे तशी नैतिकता नाही आणि धारिष्ट्यही नाही. पेट्रोलियम पदार्थांच्या तुटवड्याच्या या परिस्थितीत मनमोहन सिंगांच्या जागी लाल बहादूर शास्त्री असते तर त्यांनी सांगितले असते की मी उद्यापासून पंतप्रधानाच्या कचेरीत येताना सायकलवर बसून येणार आहे किंवा पायी येणार आहे, लोकांनी यापुढे पेट्रोलच्या गाड्या वापरणे बंद करावे कारण पेट्रोलचा तुटवडा हे राष्ट्रीय संकट आहे.
 जर पेट्रोलची किंमत वाढली तर त्यामुळे वाहनचालकांना त्रास होतो ही गोष्ट खरी आहे, पण किंमत वाढण्याचे काही फायदेही असतात आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत सांगितले की, सूट सबसिडीचे नाही काम, आम्हाला हवे घामाचे दाम कारण सबसिडीमुळे शेतकऱ्यांचे वाटोळे होते. तसेच, पेट्रोलला सबसिडी देऊन त्याची किंमत कमी ठेवली म्हणजे मोटार कारखानदार विचार करतो की अधिक पेट्रोल पिणाऱ्या मोटारगाड्या तयार केल्या तरी, पेट्रोल स्वस्त आहे म्हणून ग्राहक त्या घेतील. जसे शेतकरी वीज फुकट आहे म्हटल्यावर उसाला वारेमाप पाणी देतात तसेच पेट्रोलच्या बाबतीत चालक करतात. पेट्रोल स्वस्त असेल तर गाडी चांगली ठेवायची काळजी घेत नाही, वाहन चालवतानाही त्याने अवाजवी पेट्रोल पिऊ नये याचीही काळजी घेत नाही. पेट्रोल महाग होणे आवश्यक आहे. जगामध्ये पेट्रोल ज्या किमतीला विकले जाते त्याच किमतीला देशातील वाहनचालकांना घ्यावे लागेल, हे जर पंतप्रधानांनी सांगितले असते तर किती चांगले झाले असते. कच्च्या तेलाची किंमत ज्यावेळी १३० डॉलर प्रति बॅरल झाली त्यावेळी पंतप्रधानांनी हा विषय लपवून ठेवला. आज ती किंमत १३५ वरून १४२ डॉलर झाली आहे आणि अजून भीती आहे की ती लवकरच १७० डॉलरच्यावर जाणार आहे.
 शेतीतेल
 लाल बहादूर शास्त्रीच्या वेळी जसे देशावर अन्नधान्याचे संकट आले होते तसेच आज पेट्रोलचे संकट आले आहे. अशा परिस्थितीत लाल बहादूर शास्त्रींनी पुन्हा एकदा 'जय किसान' केले असते. पेट्रोलरूपी इंधनाचा तुटवडा भरून काढायचा असेल तर शेतकऱ्याच्या शेतामध्ये पिकणाऱ्या शेतीतेलाचा आपण जास्तीत जास्त उपयोग केला पाहिजे असे ते म्हणाले असते. हे शेतीतेल काय

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २८०