पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२८७

हे पान प्रमाणित केलेले आहे.

नाही. पण माणसामध्ये एक गोष्ट अशी आहे की जी जगामधल्या कोणत्याही प्राण्यामध्ये नाही आणि पक्ष्यामध्ये नाही; ती म्हणजे बुद्धी आहे. माणसाचे हत्यार बुद्धी आहे.
 जमीन वाढत नाही, माणसांची संख्या वाढते. माणसाने जगावे कसे याचे उत्तर माणसाने आपल्या बुद्धीच्या सामर्थ्यावर शोधून काढले आणि ते जे तंत्रज्ञान चारशे वर्षापूर्वी शोधले गेले, दुर्दैवाने ते हिंदुस्थानात यायला चारशे वर्षे लागली. ज्याला आपण आज 'हरितक्रांती' तंत्रज्ञान म्हणतो, म्हणजे सुधारलेले बियाणे घेणे, रासायनिक औषधे वापरणे, रासायनिक खते वापरणे आणि योग्य तितके पाणी देणे हे हरितक्रांतीचे जे तंत्रज्ञान आहे. ते जगामध्ये चारशे वर्षापूर्वी आले. हिंदुस्थानात राज्यकर्त्यांनी हे तंत्रज्ञान येऊ दिले नाही. 'आले तर मग छोट्या शेतकऱ्यांचे वाटोळे होईल, मोठे शेतकरीच त्याचा फायदा खाऊन जातील' अशी नेहमीची सरकारी क्लुप्ती. आजच्या कर्जमाफीच्या योजनेत जसे छोटे मोठे असे भांडण लावले तसे नेहरूंच्या जमान्यापासून छोट्या मोठ्या शेतकऱ्यांमध्ये भांडण लावायचे आणि शेतकऱ्यांना अडकवून ठेवायचे हा कार्यक्रम चालू आहे. हरित क्रांतीने हिंदुस्थानात पीक वाढले, चारशे वर्षांनी का होईना आणि जनतेची अन्नाची गरज देशातल्या देशात भागू लागली; अमेरिकेतून अन्नधान्याची जहाजे येण्याची आवश्यकता राहिली नाही.
 आणि त्यावेळी हे लक्षात आले की हे तंत्रज्ञान चांगले आहे; पण रासायनिक औषधे वापरली, वरखते वापरली तर जमिनीचा कस कमी होतो. एवढेच नाही तर, जो काही भाजीपाला आपण पिकवतो त्याचासुद्धा गोडवा कमी होतो. अन्नधान्यात, भाजीपाल्यात, दूधदुभत्यात आणि फळफळावळीत त्यातील काही अंश शिल्लक राहतात. चांगले झाले, एका वेळी हरित क्रांतीमुळे आमची पोटे भरू लागली; पण हे तंत्रज्ञान काही पूर्णपणे निर्दोष तंत्रज्ञान नाही. त्यातील दोषांचे परिणाम कालांतराने दिसू लागताच, या तंत्रज्ञानाने आपल्या हातातील भिकेचा कटोरा घालवला हे विसरून काही महाराज, संत, बाबा, गांधीवादी म्हणू लागले नैसर्गिक शेती करा म्हणजे खताच्या ऐवजी फक्त गाईम्हशींचे शेण वापरा, औषधांच्या ऐवजी कडूनिंब, गोमूत्र वापरा; पण फक्त गाईम्हशींचे शेण आणि पालापाचोळा वापरून जर का आपण शेती पिकवली तर हिंदुस्थानातली निम्मी प्रजा भुकेने मरून जाईल. १९६० सालाच्या आधी आपल्यावर तशीच वेळ आली होती. त्यावर हरित क्रांतीचे तंत्रज्ञान सापडले म्हणून आपण वाचलो. आता पुन्हा त्या जुन्या वाटेला जाऊन लोकांची पोटे कशी भरणार? कोणतेही तंत्रज्ञान पूर्णतः निर्दोष असूच शकत नाही. एखाद्या तंत्रज्ञानाचे तोटे त्याच्यापेक्षा प्रगत तंत्रज्ञानानेच

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २८७