पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२९५

हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्रेतायुगात वामनाने बळिराजाला पाताळात गाडले त्या गाडलेल्या जमिनीतून आणि पाताळातून बळिराजाने आपल्या लाडक्या लेकरांकरता - तुम्हा सगळ्या शेतकरी भावाबहिणींकरिता लक्ष्मी पाठवून दिली आहे. तंत्रज्ञान असे सांगते की तुमच्या शेतामध्ये पिकणारा ऊस असो ज्वारी असो, बटाटा असो का मका असो, अगदी साधी हिरवळ, कोणतेही तण, साधी हरळीसुद्धा या तंत्रज्ञानामुळे पेट्रोल होऊ शकते. तुम्ही आता साधे कुणबी राहिले नाही, मध्यपूर्वेतील अरबशेखांकडे जशी तेलाची खाण लागते तशी तेलाची खाण तुमच्या शेतात लागली आहे. ही बळिराजाने पाठवलेली कृपा आहे.पेट्रोलला पर्याय देणारे हे 'शेततेल' बनविण्याचे यंत्र औरंगाबाद अधिवेशनात पाहायला मिळणार आहे. एकेका शेतकऱ्याला दररोज १०० ते १५० लिटर 'शेततेल (इथेनॉल)' तयार करता येईल. हे तिसरे तंत्रज्ञान आहे 'E' म्हणजे इथेनॉल निर्मितीचे.
  माणसाची आणि शेतीची प्रगती तंत्रज्ञानामुळे आहे झाली आहे हे मी तुम्हाला पटवून सांगितले आहे, शेतीचा इतिहास सांगितला आहे. ही शेतीला स्वातंत्र्य मिळविण्याची मोहीम चालू आहे पण एक नेहमीचीच अडचण आहे. कार्यकर्ते म्हणतात सणासुदीच्या दिवसात प्रचार कसा होणार आणि अधिवेशनाला लोक कसे येणार. तुम्हाला बळिराजाचा वर मिळाला, तुमच्या शेतामध्ये लक्ष्मी प्रगटू पाहाते आहे. आम्ही कार्यकर्त्यांशी चर्चा करून औरंगाबाद अधिवेशनाचे घोषवाक्य ठरवले - 'लक्ष्मी प्रगटते आहे आपल्या शेतात' दिवाळीचे लक्ष्मीपूजन सगळे जग ऑक्टोबरच्या शेवटी करणार आहे. पण शेतकऱ्यांचे खरे लक्ष्मीपूजन ८,९ आणि १० नोव्हेंबरला औरंगाबाद येथे होत आहे.
 या अधिवेशनाच्या विषयपत्रिकेचे आकलन करण्याची कुवत नसलेले लोक - शेतकरीहिताचे विरोधक पुढारी, पक्ष कार्यकर्ते, पत्रकार - तुम्हाला अधिवेशनाला येण्यापासून रोखण्यासाठी कदाचित म्हणतील की, 'शरद जोशी आता म्हातारे झाले आहेत; पहिल्यांदा आंदोलनाची भाषा करायचे, रस्त्यावर उतरायची भाषा करायचे, तुरुंगात जायची भाषा करायचे; आता तंत्रज्ञानाची भाषा करायला लागले, बिचारे दमले बर का!' मी म्हातारा झालो हे खरे आहे पण, मी दमलो नाही, मी तुमच्यात आलो आहे, काळाशी सुसंगत ताजा विचार घेऊन आलो आहे आणि तुम्हाला सावधही करायला आलो आहे.
 शेतीतील दारिद्र्यातून सुटण्याची चालून आलेली ही संधीही सरकार शेतकऱ्यांच्या हातून हिसकवून घेऊ पाहत आहे. 'शेततेल' तयार करण्याची परवानगी देणे सरकारच्या हाती, पेट्रोलमध्ये ते किती प्रमाणात मिसळायचे तेही सरकारच ठरवणार, ते वापरणारे गाडीवाले नाहीत आणि वर त्याची किंमत

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २९५