पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/३०४

हे पान प्रमाणित केलेले आहे.

वाढवला आहे की आता काही काळ थोडा विश्राम घेण्याची गरज आहे.'
 पंतप्रधानांचे विधान आणि माझ्या शेतकरी विद्यार्थ्याने दिलेले पानगळीचे उदाहरण किती जुळणारी आहेत!
 समाजवादाच्या काळात सगळीकडे कायमचीच बेकारी होती, नोकरीतून कोणाला काढून टाकीत होते असे नाही, बेकारीच होती आणि समाजवादाच्या काळात काही केले तरी विकासाचा दर ३ टक्क्यांच्या वर कधी गेला नाही. काही का असेना, खुल्या व्यवस्थेमुळे, एकदा का होईना, आम्हाला आकाशात भरारी मारून, दोन्ही पंख हलवून ८ टक्के, ९ टक्के, १० टक्के विकासदराच्या स्वच्छ वाऱ्याचा अनुभव घ्यायला मिळाला. आता एखादा दिवस थोडे खाली उतरून एखाद्या पक्ष्याप्रमाणे झाडावर बसून विश्रांती घेऊ. हे माझ्या त्या अशिक्षित शेतकरी विद्यार्थ्याच्या बोलण्यातील सार होते. संपूर्ण जगातील मंदीला 'पानगळी'ची उपमा देणे हे प्रतिभेचेच द्योतक आहे.
 अधिवेशनाचे निमंत्रण देऊन झाल्यानंतर आणखी एक समस्या उभी राहिली. मी महाराष्ट्रातीलच आहे. जन्मभर एका गोष्टीवर मी विश्वास ठेवला. मी शेतकरी घरातला नाही, शेतकरी जातीचा नाही तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या कामाकरिता मी माझे सगळे आयुष्य झोकून दिले आणि शेतकऱ्यांनीही मला त्यांच्या पोटच्या पुढारी पोरांपेक्षा भरभरून प्रेम दिले. जो मनुष्य, जन्माच्या अपघाताने जे मिळते त्याचा अभिमान बाळगतो त्याला मी 'क्षुद्र' हा शब्द वापरतो. माणसाचा जन्म म्हणजे एखादा अर्ज करून मिळविण्याची गोष्ट आहे काय? मी ब्राह्मण घरात जन्मलो म्हणून ब्राह्मण्याचा अभिमान बाळगणे क्षुद्रपणाचे ठरले असते. ब्राह्मण जन्मलो तरी ब्राह्मण्याचा अभिमान न बाळगता शेतकरी बनलो तसेच पुरुष म्हणून जन्माला आल्याचा अभिमान न बाळगता शेतकरी महिला आघाडीच्या सेवेकरिता आयुष्य दिले. मग, महाराष्ट्रात जन्मला आहात म्हणून मराठी भाषेचाच अभिमान बाळगा असे जर मला कोणी सांगू लागले तर माझे उत्तर मी आधीच दिले आहे की, "मला माझ्या अनुभवांची अभिव्यक्ती साऱ्या जगासमोर करायची आहे; ज्या भाषेमध्ये मला जगाशी संवाद साधता येईल, जी भाषा वापरल्यानंतर माझा शब्द त्याच्यापर्यंत पोहोचल्याची पावती समोरच्याच्या डोळ्यात मला दिसेल ती भाषा मी वापरीन. वेगवेगळ्या विषयांनुसार आणि समोरच्या श्रोत्यांनुसार कोणती भाषा वापरायची हे ठरवण्यास माझा मी स्वतंत्र आहे. माझ्या आत्म्याच्या आविष्काराच्या आड येण्याचा कोणालाही अधिकार नाही."
 तुमची भाषा अवश्य वापरा, तिचा अभिमानही बाळगा. पण त्याच्याकरिता दुसऱ्या भाषेच्या लोकांचा राग करण्याचे कारण काय? महाराष्ट्राच्या लोकांचे

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ३०४