पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/३०८

हे पान प्रमाणित केलेले आहे.

आतंकवादी जसे बाँब कसे बनवायचे याच्या बारीकसारीक सूचना देतात तशा इथेनॉल बनवण्याच्या सूचना तुम्हाला देण्याची गरज नाही. तुम्ही तुमचे तुमचे यंत्र आणि तंत्र बनविण्यास समर्थ आहात. तुम्हाला ज्या ताकदीने शक्य असेल त्या ताकदीने इथेनॉल तयार करा. शेततेलाचे उत्पादन हा शेती उत्तम करण्याचा राजमार्ग आहे. त्यामध्ये सरकारने अडथळा तयार केला आहे. शेतकऱ्याच्या शेतामध्ये जे जे काही तयार होते - हिरवा पाला, केळीची सालेसुद्धा - त्या सर्वांपासून इथेनॉल तयार होऊ शकते.
 पण सरकार म्हणते तुम्हाला इथेनॉल तयार करायचे असेल तर आमच्याकडून परमिट घेतले पाहिजे; तुम्ही इथेनॉल तयार केले तरी तुम्हाला ते विकता येणार नाही, तुम्हाला ते वापरता येणार नाही, कोणाच्या गाडीमध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉल किती प्रमाणात मिसळायचे तेही सरकारच ठरवणार; इथेनॉलची किंमत पेट्रोल कंपन्या ठरवणार. म्हणजे तुम्ही इथेनॉल तयार केले तरी त्यातून निर्माण होणारी लक्ष्मी तुमच्या हाती राहू नये असा सरकारने चंग बांधला आहे.
 म्हणजे इथेही समरप्रसंग आहे; पण घाबरण्याचे कारण नाही. अशा प्रकारची लढाई आपण दहा वर्षापूर्वी लढून जिंकली आहे. ज्यावेळी जैविक बियाणे आले त्यावेळी आपण त्याच्या बाजूने उभे राहिलो. तेव्हा जैविक तंत्रज्ञानाचे विरोधक म्हणाले की जैविक बियाणे आले तर हिंदुस्थानातील बियाणे उत्पादक कोठे जातील? पण आज हिंदुस्थानातील डझनांनी बियाणे उत्पादक नवीन नवीन जैविक बियाणी - अधिक उत्पादन देणारी, किडींना प्रतिकार करणारी - तयार करून शेतकऱ्यांना पुरवू लागले आहेत. पूर्वी ज्या जमिनीत दोनचार क्विटल कापूस पिकण्याची मारामार होती तिथे आज वीसवीस क्विटल कापूस पिकू लागला आणि हिंदुस्थान दुसऱ्या क्रमांकाचा कापूस उत्पादक देश बनला याचे सारे श्रेय कापसाच्या जैविक बियाण्याला BT ला आहे. सरकार जैविक बियाण्याला परवानगी द्यायला तयार नव्हते, पण आपण त्या तंत्रज्ञानाच्या बाजूने उभे राहून प्रसंगी कायदेभंगाची तयारी ठेवली म्हणून सरकारला माघार घ्यावी लागली. आज पुन्हा एकदा आपली परीक्षा होणार आहे.
 स्वातंत्र्य आंदोलनात महात्मा गांधी म्हणायचे की मला स्वदेशीच्या चळवळीकरिता कापडाच्या गिरण्या काढायच्या नाहीत, मला लोकांच्या हाती चरखा द्यायचा आहे; गिरण्यांवर बंदी येऊ शकते, चरख्यांवर बंदी येऊ शकत नाही. आपल्या प्रतिनिधी अधिवेशनात इथेनॉल निर्मितीच्या तंत्रज्ञानाची माहिती द्यायला एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ आले होते त्यांना मी म्हटले की इथेनॉलची फॅक्टरी कशी काढायची यापेक्षा इथेनॉलसाठी 'चरखा' कसा बनवायचा ते मला

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ३०८