पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/३१८

हे पान प्रमाणित केलेले आहे.

ते नाचू द्या. ज्यांच्याकडे देश वाचवण्याचा काही कार्यक्रम नाही, जे केवळ जातीच्या आधाराने आरक्षणासारखेच मुद्दे घेऊन परिवर्तन घडवून आणण्याच्या बाष्कळ गप्पा मारतात त्यांचा आपण विचारसुद्धा करू नये.
 आपल्या बाजूने एकच गोष्ट महत्त्वाची आहे. आपण कधीही असत्याचा आधार घेतला नाही, जे सत्य दिसले तेच निर्भीडपणे मांडले. निवडणुकीच्या मोहाने जर का आपण आपल्या जाहीरनाम्यात काही आमिषे - उदाहरणार्थ, मराठी माणूसवाद किंवा आरक्षणवाद - दाखवली तर आपण गेल्या पस्तीस वर्षांत कमावलेले सगळे पुण्य नष्ट होऊन जाईल. काही अपवादांचा डाग लावून ही पुण्याई नष्ट करण्याचा विचारसुद्धा करू नका.
 महाराष्ट्राची जी परंपरा आपण ओळखतो आणि त्या परंपरेसाठी आपण सर्वांनी इतकी वर्षे जीव ओतला आहे ती परंपरा असे सांगत नाही की महाराष्ट्रातील लोक हे अप्पलपोटे आहेत. मराठी लोक फक्त स्वतःचे पोट भरण्याकरता धडपड करणारे आहेत, बाहेरच्या माणसाला खाऊ घालीत नाहीत अशी अपकीर्ती महाराष्ट्राची व्हावी अशी भूमिका स्वतंत्र भारत पक्ष आणि शेतकरी संघटना कदापि घेणार नाही. औरंगाबाद अधिवेशनात आपण स्पष्ट शब्दांत मांडले की जे समाज एकाच प्रदेशात बसून राहिले त्यांचे भले कधीही होत नाही. दैवयोगाने, महाराष्ट्रावर जर का एखादा हल्ला झाला आणि मराठी माणसांना निर्वासित व्हावे लागले तर सिंधी लोकांनी जशी आपली कर्तबगारी दाखवली, त्याहीपेक्षा ज्यू लोकांनी जसे स्वतःला सर्वश्रेष्ठ सिद्ध केले तसे मराठी लोकसुद्धा करतील. जर कोणी त्यांना इथल्या इथे गोंजारत ठेवत असतील तर ते त्यांचे मोठे शत्रू आहेत, ते त्यांना बुडवायचे ठरवीत आहेत. आपण आपला जो शुद्ध विचार आहे तो शेवटपर्यंत धरून ठेवणार आहोत.
 पक्षाला मान्यता मिळवून हक्काचे चिन्ह मिळवायचे तर लोकसभेत निदान २ खासदार किंवा सर्व मिळून किमान ६% मतदान मिळवायला हवे. आता विचाराबद्दल इतका सगळा चोखंदळपणा दाखवून हे कसे साधायचे? दोन जागा मिळवणे अवघड असेल तर आपण ज्या सतरा जागा गेल्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला विनाअट मिळवून दिल्या त्यावर आपला अधिकार आहे. त्या सगळ्याच्या सगळ्या लढवून ६ टक्क्यांचे उद्दिष्ट गाठू शकतो. अजून सत्तेचा अतापता नाही आणि लोकांना पंतप्रधानकीची स्वप्ने पडू लागली आहेत! त्यांना अलीकडचा इतिहासही आठवत नाही. गेल्या निवडणुकीत दिल्ली, राजस्थानमध्ये मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार जाहीर केले नसते तर दोन्ही राज्यांत

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ३१८