पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/३१९

हे पान प्रमाणित केलेले आहे.

रालोआ जिंकली असती हे खरे आहे. रालोआ आजच पंतप्रधानाचे नाव घोषित करते आहे ही घोडचूक आहे.
 आपण कोणतेही दरवाजे बंद करीत नाही. पण मागील निवडणुकीत महाराष्ट्रातल्या ज्या १७ जागा भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांना शेतकरी संघटनेच्या आणि स्वतंत्र भारत पक्षाच्या प्रभावी प्रचारामुळे मिळाल्या त्या सगळ्या जागा आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे मागणार आहोत; पण आज आम्ही सर्वप्रथम सात जागांची मागणी करीत आहोत.
 चंद्रपूर - आ. वामनराव चटप, परभणी - डॉ. मानवेंद्र काचोळे, नांदेड - श्री. गुणवंत पा., बुलडाणा - श्री. वामनराव जाधव, रामटेक - श्री. राजकुमार तिरपुडे, धुळे - श्री. शरद जोशी किंवा श्री. रामचंद्र बापू पाटील, हातकणंगले
 असे हे सात मतदारसंघ असून हातकणंगले मतदारसंघातील उमेदवार ठरवण्याचे अधिकार मी वामनराव चटप यांच्याकडे सोपवतो.
 १९९८ साली अमरावती येथे भरलेल्या जनसंसदेमध्ये भाषण करताना मी चर्चिलच्या एका वक्तव्याचा उल्लेख केला होता. चर्चिलने असे म्हटले होते की, 'कृपा करा आणि हिंदुस्थानला स्वातंत्र्य देऊ नका. कारण या तथाकथित अहिंसावादी चळवळीच्या मागे जे नेतृत्व तयार झालेले आहे ते कचकड्याचे आणि मेणाचे आहे. त्याला प्रशासनाची काही माहिती नाही. यांच्या हाती जर राज्य गेले तर जातीजातींमध्ये वैमनस्य माजेल, एकमेकांच्या रक्ताचे पाट वाहातील. हिंदुस्थानातील गरिबांवर कृपा करा आणि त्यांना या नेत्यांच्या हाती सोपवू नका.' चर्चिलच्या तोंडी आले म्हणून लोकांना वाईट वाटले; पण महात्मा जोतिबा फुल्यांनी काय सांगितले होते? ते म्हणाले होते की, 'जोपर्यंत जातीजातीतील वैमनस्य संपत नाही आणि समाजसुधारणा घडून येत नाही त्याआधी जर का देशाला स्वातंत्र्य मिळाले तर त्या स्वातंत्र्याचे स्वरूप पेशवाईचे होईल.'
 म्हणजे, महात्मा फुले आणि चर्चिल यांच्या म्हणण्यात एकवाक्यता होती. ब्रिटिशांनी चर्चिलचे ऐकले नाही. आपण महात्मा फुल्यांचे ऐकले नाही. आपसूक हातात पडलेल्या स्वातंत्र्याने आम्ही हरखलो. कवि गोविंदांची एक कविता आहे - रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले? आम्ही मात्र रणावीण मिळालेल्या स्वातंत्र्याची फुशारकी मारू लागलो. स्वस्त मिळालेल्या गोष्टीला मोलही नसते. उतावळ्या नवऱ्याला सल्ला दिला जातो की घाईघाईने लग्न करा आणि शांतपणे पश्चात्ताप करा. तसेच, घाईघाईनी मिळवलेल्या स्वातंत्र्याची आपल्याला किंमत मोजावी लागते आहे. आताची हिंदुस्थानची एकूण परिस्थिती पाहिली की मला कविवर्य

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ३१९