पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/३२०

हे पान प्रमाणित केलेले आहे.

भा. रा. तांबे यांच्या 'रुद्रास आवाहन' या कवितेची आठवण होते. त्यात त्यांनी देशाच्या परिस्थितीचे वर्णन करताना म्हटले आहे -
 जळ तडागी सडे, बुडबुडे, तडतडे
 'शान्ति ही!' बापुडे बडबडति जन-किडे!

 सगळ्या हिंदुस्थानभर पाणी तुंबले आहे, त्यात एकमेकांशी भांडत जगणारे किडे वाढले आहेत. दोनचारपाच खुनाचे, दरोड्याचे गुन्हे केलेले लोकच आता इथे निवडून येऊ शकतात. अशा या घाणीला साफ करून, चर्चिलची भविष्यवाणी खोटी ठरवून जोतिबा फुल्यांचे स्वातंत्र्याचे स्वप्न खरे करण्याची जबाबदारी जोतिबा फुल्यांचे शिष्य म्हणून आपल्यावर आहे. दोन जागा मिळोत का ६ टक्के मते मिळोत की काही घडो, हे करताना आतापर्यंत आपण जे विचार आणि मूल्ये जोपासली, ज्या उद्दिष्टांच्या ध्यास घेतला त्याचे विस्मरण होऊ देऊ नका; त्यांच्याशी कोणत्याही तहेची तडजोड करणार नाही हा निर्धार पक्का ठेवा. आपद्धर्म म्हणून काही काळ आपल्याला राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या गुहेचा आसरा घ्यावा लागला असला तरी आपण काही कायम गुहेत बसणारी वटवाघळे नाहीत. नाही पटले तर आम्ही ताठ मानेने बाहेर पडणार आहोत. त्यांना काही सद्बुद्धी सुचली तर आपल्याला काही भांडण करायचे नाही कारण शत्रूही जबरदस्त आहे. समाजवादाचे पुन्हा एकदा राज्य यावे याकरिता ज्याप्रमाणे डावे प्रयत्न करणार आहेत त्या तऱ्हेने आपले मित्र खुली व्यवस्था टिकविण्याचे प्रयत्न करणार असतील तर त्यांना दुखावण्याचा आपला मानस नाही; पण ते जर आपल्या या मऊपणाचा गैरफायदा घेऊ लागले तर त्यांना जाणीव द्यायला हवी की आम्हाला २ खासदार किंवा ६ टक्के मते मिळतील ना मिळतील पण आम्ही वेगळे झालो तर त्यांनाही दिल्लीमध्ये लागणाऱ्या वजनात घट होऊ शकते.
 या बैठकीला येताना मी मोठ्या निराश मनाने आलो पण तुम्ही माझ्यामध्ये ही एक वेगळी दृष्टी दिली त्याबद्दल मी तुमच्या ऋणातच राहीन. पण तुम्हाला एक विनंती करतो की निदान शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती होईपर्यंत शेतकरी संघटनेतून जो कोणी फुटून निघेल तो आपला शत्रू आहे असे समजा आणि त्याप्रमाणे त्याच्याशी व्यवहार करा.

(जानेवारी २००९- कार्यकारिणी, परभणी)

(शेतकरी संघटक ६ फेब्रुवारी २००९)

◼◼◼
माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ३२०