पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/४८

हे पान प्रमाणित केलेले आहे.

काही चर्चा नाही केली; पण माझं दुर्भाग्य असं काही आहे की ८० मध्ये जे म्हटलं त्याच सुसंगतीनं मी आज ९१ सालचा कार्यक्रम मांडला तर लोकांच्या मनात किंवा माझ्याजवळच्या सहकाऱ्यांच्या मनामध्येसुद्धा अशी शंका निर्माण होते की मी आता काहीतरी बदललो, आता काहीतरी वेगळं सांगायला लागलो.
 शेतकरी आंदोलनाचा आढावा
 १९८० मध्ये किंवा खरं सांगायचं तर १९७८ मध्ये कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली गेली आणि कांद्याचा भाव चाकणच्या बाजारपेठेमध्ये एकदम ३४/३५ पैशांवरून १४/१५ पैशांवर येऊन पडला. निर्यातबंदी झाली. का? तर दिल्लीला कांद्याचा भाव १रु. किलो झाला, म्हणजे कांदा फार महाग झाला. इतका महाग कांदा असताना कांद्याची निर्यात होता कामा नये म्हणून निर्यातबंदी झाली आणि शेतकरी आंदोलनाची ठिणगी पडली. त्यानंतर, कांद्याच्या आंदोलनानंतर, उसाचं आंदोलन झालं, निपाणीचं तंबाखूचं आंदोलन झालं, दुधाचं झालं, भाताचं झालं, कपाशीचं झालं, कर्जमुक्तीचं झालं. कितीक आंदोलनं झाली. कशाकरिता ही आंदोलनं केली? आपल्याला काय फक्त कांद्यांचा भाव मिळवायचा होता, का उसाचा भाव मिळवायचा होता, का कपाशीचा भाव मिळवायचा होता का कर्जमुक्ती मिळवायची होती?
 त्यावेळी आपण मांडलेला विचार असा होता की 'सरकारचं धोरण असं आहे, की शेतीमालाला भाव मिळता कामा नये.' कारण, शेतकऱ्यांचं रक्त पिऊनच ही व्यवस्था वाढू शकते आणि मग एवढी कडेकोट व्यवस्था झालेली; ती व्यवस्था तोडायची कशी? शेतीमालाला भाव मिळणं याबाबतीत मी सुरुवातीला विदर्भात आलो होतो तेव्हा काय म्हटलं होतं? कापसाला भाव का मिळत नाही? कापसाचा उत्पादनखर्च कसा काढायचा हे दिल्लीत बसलेल्या माणसाला कळत नाही असं नाही. किंवा तुम्ही चांगला हिशोब काढून दिला म्हणून तो भाव आपोआप देईल असं नाही. कापसाचा खरा उत्पादनखर्च काय हे त्याला बरोबर समजतं. फक्त कापसाला उत्पादनखर्चाइतकासुद्धा भाव मिळता कामा नये, हे त्याचं धोरण आहे. कारण ही व्यवस्था त्यावर अवलंबून आहे.
 आणि मग शेतीमालाला भाव मिळू नये याकरता सरकार काय काय करतं? माझ्या सगळ्या पुस्तकांमध्ये त्याची वेगळी वेगळी उदाहरणं मी दिली. सरकार बाहेरून महागात कापूस आयात करतं आणि देशात स्वस्तात विकून कापसाचा भाव पाडतं. कापसाची निर्यात होऊ देत नाही. साखरेवर लेव्ही लावतं, उसावर झोनबंदी लावतं, रुपयाची किंमत जास्त ठेवतं. ही सगळी जी जी काही साधनं आहेत ती ती मी माझ्या पुस्तकांत मांडली आहेत आणि ही सगळी हत्यारं घेऊन

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ४८