पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/८४

हे पान प्रमाणित केलेले आहे.

का बोल." उद्यापासून सगळेच नोकरदार तुमचा रागराग करणार आहेत; पण आपण ते जाणूनबुजून ओढवून घेतलं आहे. हे निभवायची हिम्मत बाळगली तर तुम्ही खरे शेतकरी.
 ३१ मार्च, चलो दिल्ली
 तिसरा निर्णय, ३१ मार्चला आपल्याला दिल्लीला जायचं आहे. आज आपण पाहिलं गणराज्य, नेहरू अंमल संपला असं सांगितलं. शेतकरी यापुढे त्याला जे जे पाहिजे ते करणार असं सांगितलं. ते होऊ दिलं नाही तर काय करायचं, पुढचं पाऊल काय टाकायचं यासंबंधी लढाईचा कार्यक्रम जाहीर करायचा आहे. ३१ मार्च १९९३ ला नवी दिल्लीला.
 लक्ष्मीमुक्ती
 त्याआधी करायचं एक अत्यंत महत्त्वाचं काम. घरची लक्ष्मी दुःखी राहिली तर तुमच्या कामाला यश येऊ शकत नाही. घरच्या लक्ष्मीच्या घामाला दाम नाही, तुमच्या घामाला दाम मिळू शकत नाही. घरच्या लक्ष्मीचा तळतळाट असला तर तुम्हाला यश येणं शक्य नाही. घरची लक्ष्मी प्रसन्न असल्याखेरीज बाहेरची लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात येत नाही. तेव्हा जास्तीत जास्त संख्येने लक्ष्मीमुक्ती कार्यक्रमाची अंमलबजावणी करा.
 शेतकरी : दुसऱ्या गणराज्याचा आत्मा
 हा कार्यक्रम दुसऱ्या गणराज्याचा आहे. आज आपण इथून जातो आहोत ते ३० जानेवारी १९४८ ला सुरू झालेला नेहरू-अमलाचा काळाकुट्ट कालखंड संपवून जात आहोत. आज इथं सुरुवात होते आहे ती दुसऱ्या गणराज्याची होते आहे. या गणराज्याची घटना सावकाश लिहिली जाईल. त्याच्यातली कलमं सावकाश लिहिली जातील; पण त्या गणज्याचा आत्मा हा इथं बसलेले शेतकरी आहेत. येताना त्यांच्या डोळ्यामध्ये भीती होती, कोकरासारखे बघत आले; देशभर दंगे चालले आहेत, सुरे घेऊन फिरणारे लोक मोठी मौज करत आहे हा काय प्रकार आहे या संभ्रमात आले; शेतकऱ्यांचं काय व्हायचं या चिंतेने व्याकूळ झालेल्या डोळ्यांनी आले; इथून जाताना त्यांचे डोळे निर्भय झालेले आहेत, आता आम्ही जिंकणार आहोत, कारण बापूंच्या या कुटीपासून पुन्हा एकदा एका नवीन लढ्याची स्फूर्ती घेऊन आम्ही जातो आहोत, आमचे डोळे आता कोकराचे नाहीत, आमचे डोळे आता वाघाचे बनले आहेत असं समजून जात आहेत.

(३० जानेवारी १९९३- सेवाग्राम, जि. वर्धा मेळावा)
(शेतकरी संघटक ६ फेब्रुवारी १९९३)


◼◼

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ८४