पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/९६

हे पान प्रमाणित केलेले आहे.

म्हटलं आणि वीज तोडायला लोक आले तर, आवश्यक तर नवीन वीज जोडून देण्याचं काम कोण करणार? आणि त्या सर्व वीज अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करायला कोण येणार? या प्रश्नाचं उत्तर मी देण्याचं कारण नाही. यासंबंधी आदेश १९४२ मध्ये तुम्हाला इतिहासाने दिलेला आहे. १९४२ मध्ये स्वतंत्र राज्य जिथं जिथं तयार झाली तिथं तिथं आपल्याला स्फूर्ती देणारी एक घटना घडली. त्यातून निर्माण झालेली संस्था म्हणजे 'नाना पाटील ब्रिगेड' गावोगाव 'नाना पाटील ब्रिगेड' तयार करा आणि जे जे कोणी अन्याय करायला येतील त्यांचा बंदोबस्त कसा करायचा हे तुमचं तुम्ही ठरवा.
 शांतता संपली आहे. कारण या देशामध्ये आता फक्त बंदूकधारी, पिस्तूलधारी, मशीनगनधारीच फिरताहेत. बाँबची भाषा चालते आहे आणि सरकार त्याच्यापुढे काही करू शकत नाही; पण भाकरीचं स्वातंत्र्य मागणाऱ्या लोकांनी मात्र निमूटपणे काहीही न करता हात जोडून 'शरद पवारां'चे अन्याय सहन करायचे हे आम्ही मानणार नाही. तम्ही उद्यापासन स्वतंत्र आहात. करा किंवा मरा. तुमच्यातला प्रत्येक तरुण हा आजपासून 'नाना पाटील ब्रिगेड'चा सैनिक झाला असं मी जाहीर करतो.
 'नाना पाटील ब्रिगेड'चं काम काय? दहा नोव्हेंबरपर्यंत तुम्ही आपलं गाव स्वतंत्र असल्याचं जाहीर करायचं आहे. दहा नोव्हेंबर हा आपला 'शेतकरी हुतात्मा दिन' आहे. तुम्हाला दहा दिवसांत लक्ष्मीमुक्तीचा आणि दारूदुकानबंदीचा कार्यक्रम आटपायचा आहे. दारूदुकानबंदीवाल्यांना गावात राहायलाच भीती वाटावी असं वातावरण तयार करा.
 दहा नोव्हेंबरनंतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी खुलेआम गाड्या काढून दुसऱ्या राज्यात कापूस न्यायला सुरुवात करा. मध्ये कोणी पोलिस आले तर त्यांना सामना देण्याची जबाबदारी मी 'नाना पाटील ब्रिगेड'वर सोपवतो आहे.
 कर भरला नाही, वीजबिल भरलं नाही म्हणून कोणी आलं तर त्यांचा सामना 'नाना पाटील ब्रिगेड'नं करायचा आहे. आपलं आंदोलन शेतीसंबंधी आहे. घरगुती वापराच्या विजेचं बिल सर्वांनी भरायचं आहे. शेतीसाठी वापरलेल्या विजेचं बिल भरायचं नाही. हे बिल भरलं नाही म्हणून जर गावाची वीज तोडली तर ती पुन्हा जोडण्यासाठी 'नाना पाटील ब्रिगेड'ने पुढे यावं.
 जो जो म्हणून अन्याय होईल त्याला विरोध करण्याकरिता 'नाना पाटील ब्रिगेड'ने पुढे यावं.
 कापसाचे रेचे टाकले आणि सरकारनं म्हटलं आम्ही ते जप्त करतो तर 'नाना पाटील ब्रिगेड'ने त्यांचा सामना करावा.

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ९६