पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१५१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

, स्त्रीसाठी आनंददायी असणारच अशी सोईची समजूत काही पुरुषांनी करून घेतलेली दिसते. याचा दुसरा पैलू, “जर स्त्रीनं बलात्काराला प्रतिकार केला नसेल तर तो बलात्कार कसा म्हणायचा?" या प्रश्नात दिसतो. म्हणजेच स्त्रीची संभोगाला संमती होती व तिने लावलेला बलात्काराचा आरोप खोटा आहे, असं सुचवायचा प्रयत्न होतो. एखादा गंभीर प्रसंग अंगावर आल्यावर प्रतिकार करणं, पळून जायचा प्रयत्न करणं किंवा गांगरून जाणं (फाइट, फ्लाईट, फ्रिझ), या पर्यायातले अनेकजणांना फक्त पहिले दोनच पर्याय माहीत असतात. घाबरून काहीजण प्रतिकारच करू शकत नाहीत, पळून जायची अंगात ताकद उरत नाही या स्थितीची अनेकांना माहिती नसते. कोर्टातसुद्धा स्त्रीनं प्रतिकार केला नाही म्हणजे तिची या संभोगाला संमती होती, असा युक्तिवाद केला गेला आहे. पण आता कोर्ट मानू लागलं आहे, की प्रतिकार झाला नाही म्हणजे त्या स्त्रीची या संभोगाला संमती होती, असा अर्थ होत नाही. याच पुरुषी नजरेचा अजून एक पैलू म्हणजे, स्त्री वेश्येवर किंवा पुरुष वेश्येवर लैंगिक जबरदस्ती होऊ शकत नाही' असा समज. काही पुरुष म्हणतात, की जर ती व्यक्ती शरीरविक्री करते तर तिच्यावर बलात्कार होण्याचा प्रश्न येतोच कुठे?' या दृष्टिमागे वेश्याव्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला स्वतःचे अधिकारच नसतात ही धारणा आहे. कोणाबरोबर संभोग करायचा, काय किंमत ठरवायची, कोणत्या लैंगिक कृती करायच्या हे ठरवण्याचा गिहाइकालाच अधिकार आहे, असा दृष्टिकोन दिसतो. वेश्यांच्या अधिकारांचं काय? जर वेश्येला इच्छा नसेल तर तिच्यावर जबरदस्ती करणं हा बलात्कार नाही का? स्त्रीनं बलात्कार स्वत:वर ओढवून घेतला किंवा तिला तो थोडा जरी आवडला असेल किंवा तिचं चारित्र्य वाईट होतं म्हणून तिच्यावर झालेला बलात्कार हा गुन्हा नाही किंवा तो अत्यंत सौम्य दर्जाचा गुन्हा आहे, अशा त-हेचे युक्तिवाद अनेक वेळा होताना दिसतात. या सगळ्या धारणांबरोबर स्त्रीची इज्जत ही तिच्या आयुष्यापेक्षा मोठी आहे ही दृष्टी, बलात्कार होणं हे मरणाहून वाईट आहे ही धारणा, ही पुरुषी दृष्टी अनेक वेळा सिनेमात उतरते. बलात्कार झाला, की स्त्री शरमेनं आत्महत्या करते असं दाखवलं जातं. दुसऱ्यानं केलेल्या गुन्ह्यासाठी तिनं तिचं आयुष्य का गमवावं? तिने स्वत:ला का दोषी मानावं? तिनं या प्रसंगातून सावरून परत ताठ मानेनं जगासमोर का उभं राहू नये? बलात्कार झालेल्या व्यक्तीकडे समाजाचा बघायचा दृष्टिकोन इतका वाईट आहे, की बहुतेक बळी पडलेल्या व्यक्ती पोलिसात तक्रार करत नाहीत. अशाने मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख १३७