पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१६९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 गर्भाशयमुखाचा कर्करोग लगेच लक्षात येत नसल्यामुळे काही वेळा तो खूप वाढल्यावर लक्षात येतो. म्हणून पस्तिशीनंतर दर वर्षातून एकदा 'पॅप स्मीयर' किंवा 'व्ही.आय.ए.' ही चाचणी करावी. 'पॅप स्मीयर' चाचणीत गर्भाशयमुखाच्या दोनचार पेशी काढून त्यात कर्करोगाची लागण झाली आहे का हे तपासलं जातं. व्ही.आय.ए' चाचणीत गर्भाशयमुखाला विशिष्ट रसायन लावून पेशींच्या रंगात

कोणता बदल दिसतो यावरून कर्करोगाची लागण झाली आहे का, हे तपासलं जातं.

 या आजाराचा आपल्या शरीरावर व मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होतो. आपल्या आयुष्याचा हा प्रश्न असल्यामुळे जोवर शस्त्रक्रिया, औषधोपचार होऊन तो नियंत्रणात येत नाही तोवर कोणत्याच गोष्टीत मन लागत नाही. या काळात लैंगिक इच्छाही लोप पावू शकतात. जसजसं बरं वाटायला लागतं तसतशा लैंगिक इच्छा परत व्हायला लागतात पण कर्करोगापासून व त्याच्यावरच्या घेतलेल्या उपचारांपासून येणाऱ्या लैंगिक अडचणींबद्दल जर रुग्णाने डॉक्टरांशी चर्चा केली नसेल, तर होणाऱ्या परिणामांबद्दल रुग्णाची मानसिक तयारी झालेली नसते. म्हणून रूणाने डॉक्टरांशी न लाजता या विषयाबद्दल बोलणं गरजेचं आहे. एक ताई म्हणाल्या, "जेव्हा माझं गर्भाशय व स्त्रीबीजांड काढली तेव्हा मला काहीही सांगितलं नव्हतं. एकतर मी डॉक्टरांकडे जायचे तेव्हा खूप गर्दी असायची. त्यात त्यांच्याशी बोलताना सारखं कोणी ना कोणी मध्ये मध्ये यायचे. त्यात आपलं बरं होणं ही महत्त्वाची बाब असल्यामुळे या (लैंगिक) विषयाला तेव्हा महत्त्व नव्हतं. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर 'राऊंड' घेताना माझ्यापाशी कायम माझे नातेवाईक असायचे. या सगळ्यांमुळे त्यांना या विषयावरचं काही विचारण्याचा प्रश्नच नव्हता आणि त्यांनीही काही आपणहून सांगितलं नाही."

पूरस्थ ग्रंथीचा कर्करोग

 पूरस्थ ग्रंथीच्या कर्करोगावर औषधं किंवा शस्त्रक्रिया हे पर्याय असतात. शस्त्रक्रियेमुळे पूरस्थ ग्रंथीच्या आजूबाजूचे काही स्नायू कापले जाऊ शकतात, ज्याच्यामुळे लिंगाला ताठरपणा येण्यास अडचण येऊ शकते. पुरुषबीज व वीर्यनिर्मितीस अडचण येत नाही, पण काहीजणांचं वीर्यपतन झाल्यावर वीर्य लिंगाच्या बाहेर न येता ते मूत्राशयात जाऊ शकतं.

 पूरस्थ ग्रंथीचे काही विशिष्ट कर्करोग आहेत जे 'अँड्रोजेन' संप्रेरकामुळे वाढू शकतात. असं असेल तर 'अँटी-अँड्रोजेन' औषधं देऊन कर्करोगावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जातो. 'अँड्रोजेन' संप्रेरक कमी झाल्यामुळे पुरुषाला लैंगिक इच्छा कमी होणं, स्तनं वाढणं असे परिणाम दिसू शकतात.

मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख

१५५