पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/५८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बदलण्याचा सराव 'व्हॉईस थेरपिस्ट' कडून करून घेतात. काहींना नव्या पद्धतीनं चालणं, बोलण्याचा प्रयत्न करावा लागतो. काहींना या बदलाला सरावण्यासाठी अनेक महिने लागू शकतात. यानंतर हळूहळू आत्मविश्वास वाढू लागतो, मन आनंदी होतं, शांत होतं, नवीन जीवनशैलीत ती व्यक्ती पूर्णपणे एकरूप होते आणि मग ती व्यक्ती जगाचे इतर रंग अनुभवण्यास स्वतंत्र होते.

 हे सगळं वाचून साहजिकच मनात प्रश्न येतो, की हे सगळं करायचा एवढा त्रास कशाला घ्यायचा? तर याचं उत्तर असं की अशा व्यक्तींनी कसं जगायचं, आयुष्य अनुभवायचं हे त्या व्यक्तीवर सोडावं. त्यांची दृष्टी आपल्याला नाही, त्यांना काय त्रास होतो हे आपण भोगलेलं नाही. त्यांना हा बदल तळमळीनं हवा असतो म्हणून एवढा त्रास सोसायची तयारी दाखवतात. आपण अशा व्यक्तींच्या भावना अनुभवल्या नाहीत. म्हणून त्या भावना, इच्छा चुकीच्या आहेत, निरर्थक आहेत असं म्हणणं चुकीचं आहे. त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे आयुष्य जगायचा अधिकार आहे. आपल्याकडून त्यांना जेवढा आधार देता येईल तेवढा दयावा, जेणेकरून त्यांचा प्रवास कमी खडतर होईल.

****


४४

मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख