पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/८६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कल्पकता

 कालांतरानं त्याच जोडीदाराबरोबर तोच तोच संभोग कंटाळवाणा होतो. प्रेम असलं तरी 'पॅशन' गेलेली असते. म्हणून 'पॅशन' प्रयत्नपूर्वक आणायचा प्रयत्न करावा लागतो. संभोगात कल्पकता आणली नाही तर तो रटाळ बनतो, यांत्रिक बनतो. तसं होऊ नये म्हणून काहीजण संभोगाचे प्रकार बदलतात. तर काहीजण संभोगाच्या पोझिशन्स बदलतात, काहीजण संभोगाची जागा बदलतात (बेडरूम, हॉल, किचन, लॉज इत्यादी), काहीजण संभोग करायची वेळ बदलतात (रात्र, सकाळ, दुपार). अनेकजण अश्लील वाङ्मयाचा आधार घेतात. काहीजण लैंगिक उपकरणांचा वापर करतात. काहीजण कपडे, केशभूषा बदलतात. वजन वाढलं असेल तर आकर्षक बनण्यासाठी व्यायाम व संतुलित आहाराची मदत घेतात. काहीजण मधूनअधून दोन-चार दिवस मुलांना न घेता सुट्टीवर जाऊन नात्यातील 'पॅशन' परत आणायचा प्रयत्न करतात.

लैंगिक अनुभव

स्वप्नरंजन

 लैंगिक सुखाला रंगत येते ती आपल्या कल्पनाशक्तीनं. एखादया व्यक्तीला मनात आणून त्या व्यक्तीच्या बरोबर इच्छित लैंगिक कृतीचं स्वप्नरंजन करणं, ज्या लैंगिक क्रीडा वास्तवात आपण करू शकणार नाही अशा कृर्तीची कल्पना करून स्वतःला सुख देणे. समाजातील बंधनांमुळे काही विशिष्ट लैंगिक अनुभव घ्यायची इच्छा असूनही घेता येत नाहीत (त्या कृती बेकायदेशीर आहेत म्हणून किंवा समाजमान्य नाहीत म्हणून). त्या कृतीच स्वप्नरंजन करून आनंद मिळवणं, असे सर्व प्रकार स्वप्नरंजनात येतात.

 "स्वप्नरंजन करून काही अपाय होतो का?" अशा त-हेचे प्रश्न अनेक वेळा विचारले जातात. लोकांना काळजी असते की कल्पनेतील कृती वास्तवात उतरणार तर नाही? कल्पनेत मी खलनायक असेन तर मी वास्तवातही खलनायक बनेन का? उदा. एकजण म्हणाले, “मला काहीवेळा एखादया व्यक्तीवर बलात्कार करायचं स्वप्नरंजन करायला आवडतं. अशाने मी खराच रेपिस्ट बनेन का?"याचं उत्तर आपल्याला स्वप्नरंजन आणि वास्तव यांतील फरक किती उमजतो यावर अवलंबून आहे. सिनेमात बलात्कार पाहिला किंवा तो पाहताना आवडला म्हणून सगळेजण बलात्कार करतात का? नाही. कारण आपण सिनेमा आवडो किंवा न आवडो तो करमणुकीच्या दृष्टीने बघतो आहोत आणि जे बघतो आहोत ते काल्पनिक आहे याची जाणीव आहे. वास्तवाची व कल्पनेची जोवर जाण आहे, तोवर आपलं भान सुटेल ही भीती बाळगायचं कारण नाही. स्वप्नरंजनातून कोणालाही इजा होत नाही,


७२

मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख