पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/९७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सावधान - जसं एखादया सुंदर सिनेमात आपण पूर्णपणे रमून जातो पण तरी एका पातळीवर हे नाट्य आहे हे जाणून असतो तसंच इथे या कृती एका पातळीवर नाट्य आहेत ही जाण विसरता कामा नये. एखादयाचं भान सुटलं तर ही नाट्यं हाताबाहेर जाऊ शकतात, आपल्याला व आपल्या जोडीदाराला इजा पोहोचवू शकतात, आपला/आपल्या जोडीदाराचा जीव धोक्यात आणू शकतात. हे प्रकार सावधपणे व जोडीदाराच्या संमतीनचं झाले पाहिजेत. लैंगिक उत्तेजनाच्या भरात भान हरपून जोडीदारावर अन्याय होणार नाही याची सदैव जाण असलीच पाहिजे. आपला संयम सुटेल अशी भीती वाटत असेल तर असे प्रकार करू नयेत.

नीतिमूल्य

 मला काहीजण विचारतात, की “चाकोरीबाहेरचे लैंगिक सुख घेण्याचे प्रकार वाईट आहेत का?" तेव्हा मी सांगतो की जोवर त्या व्यक्ती काही मूलभूत नियम पाळतात तोवर कोणतीच लैंगिक कृती चुकीची, आजार किंवा विकृती नाही. प्रत्येकाची आवड वेगळी, ती पुरी करण्याचा त्याला/तिला पूर्ण अधिकार आहे. त्यात कोणताच धार्मिक, सांस्कृतिक, वैद्यकीय व कायदयाचा मापदंड लावायचं कारण नाही.

नियम

  • दोघेजण प्रौढ असले पाहिजेत.
  • लैंगिक संबंध संमतीने व्हावेत. (ती संमती फसवून, खोटं बोलून, दमदाटी करून मिळवलेली नसावी.)
  • संभोगखासगीत व्हावा.
    आवश्यकतेनुसार निरोधचा वापर करावा.
  • वस्तू किंवा चाकोरीबाहेरच्या मार्गानी लैंगिक सुख घेताना आपला/आपल्या जोडीदाराचा जीव धोक्यात येणार नाही, इजा होणार नाही याची काळजी घेतली जावी.
मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख

८३