पान:मी भरून पावले आहे.pdf/161

हे पान प्रमाणित केलेले आहे.

म्हणालीस? त्याला काय शब्द वापरलास? प्यायलेला आहे का नाही हे तुला कसं कळलं? त्याच्याबद्दल असं बोललेलं मला खपणार नाही.' तर मी म्हटलं, 'सॉरी, मी त्या अर्थानं म्हणाले नव्हते. तो माणूस मला आवडत नाही अशातला भागच नाही. आपल्या घरी त्यानं येऊ नये अशातला पण भाग नाही. फक्त तो रात्री बेरात्री येतो याच्यावरून मी बोलले. मला त्रास होतो म्हणून. पाहिजे तर मी त्याची क्षमा मागेन. म्हणून तो येत नाही का आपल्याकडे?' तर नाही. त्याला तर माहितीच नव्हतं. मग बघितलं मी हाच लाला लजपतराय जेव्हा हे आजारी पडले तेव्हा उशाशी बसून असायचा. पैशांची मदत करायचा, औषधं आणून द्यायचा. भाभीजान, आपने खाना नही खाया, चलो, म्हणून मला सतरादा घेऊन जाऊन जेवायला घालायचा. म्हणजे खरं म्हटलं तर मलाच त्यांचा मित्र काय आहे कळलेलं नव्हतं. आणि मग मी म्हटलं, बाप रे, या माणसाबद्दल माझ्या मनात असं आलं तरी कशाला? आणि मी असं का बोलले असेन?
 दलवाई फर्स्ट ईअरला असताना जोगेश्वरीच्या इस्माईल युसूफ कॉलेजमध्ये शिकत होते. त्या वेळी कुलसुम पारेख त्यांना शिकवायला होत्या. हे मला सुरुवातीला माहीत नव्हतं. पुढे दलवाई अडचणीमुळे शिकू शकले नाहीत. आणि त्यांना कॉलेज सोडावं लागलं. लग्नानंतरची गोष्ट. दलवाई सारखे कुलसूम पारेखांकडे जात असत. बाहेर पडत असताना मी विचारलं की सांगायचे, मी जरा कुलसूम पारेखांच्याकडे जातो. तू माझी वाट पाहू नको. एखाद्या वेळी मी त्यांच्याकडे जेवूनसुद्धा येईन. मी कुलसुम पारेखांना कधी भेटले नव्हते. त्यांच्याबद्दल मला काही माहिती नव्हती. या कोण आहेत? दलवाई का सारखे त्यांच्याकडे जातात? म्हणून नंतर नंतर मला संशय यायला लागला. पण दलवाईंना कशी विचारणार? मला धीर झाला नाही. दलवाई आजारी पडले. आम्ही रामटेकला होतो. एक दिवस कुलसुम पारेख या आमच्याकडे दलवाईंना बघायला येणार असं कळलं. यांनी मला सांगितलं. त्या दालगोश्त फार चांगलं करतात. ते आज माझ्यासाठी करून आणणार आहेत. तू आज जेवण करू नको. दुपार झाली, मी वाट बघत होते. त्या आल्या, मी त्यांना बघून थक्क झाले. आपल्या थोबाडीत मारून घ्यावं असं वाटलं. ही सगळी दलवाईंचीच चूक होती. त्यांनी जर तिच्याशी भेट करून दिली असती तर हे डोक्यात माझ्या आलं नसतं. तरीसुद्धा दलवाईंसारख्या माणसावर आपण संशय घेतला याची खंत वाटली. जो माणूस आपल्याला नको तेसुद्धा सांगतो, त्याच्यावर संशय घेणं आपल्याला शोभत नाही

१४६ : मी भरून पावले आहे