पान:मी भरून पावले आहे.pdf/168

हे पान प्रमाणित केलेले आहे.

सगळे जमा झाले. माझ्या मैत्रिणी आल्या. हॉस्पिटलमध्ये ८-९ वाजेपर्यंत सगळी लोकं जमली. तो सुट्टीचा दिवस होता. काही लोकांना कळलं, काहींना कळलं नाही. ३ मे १९७७. ज्यांना कळलं ते आले. पेपरमध्ये आलं. रेडिओवर सांगितलं त्यामुळं लोकांना कळलं. सगळे गावातले जमा झाले. आता चला. डिस्चार्ज द्या. आम्ही घेऊन जातो. सगळेच नातेवाईक, सख्खे - जवळचे. सगळेच गाववाले. तिथं काय आहे, तीस फॅमिलीज दलवाईंच्या आणि सगळे भाऊबंद. सगळे मुंबईलाच होते. एकाला फोन केला की कळलंच भराभर सगळ्यांना! आणि हा माणूस जाणार म्हणून चार दिवसांपूर्वी येऊनच बसलेले मुंबईला अनेक. मयत गावाला न्यायची होती त्यांना. म्हणून येऊन बसले होते. येरझाऱ्या घालत होते. बघत होते थोड्या थोड्या वेळानं, या माणसाचं काय होतं म्हणून. हे गेल्यानंतर सगळे जमा झाले आणि चला म्हणाले आता ही मयत घेऊन. इतक्यात डॉ. कुरुव्हिला आणि डॉ. कामत आले आणि ते म्हणाले का, 'बघा मिसेस दलवाई, पोस्टमॉर्टेम करावं असं आम्हांला वाटतं.' तर म्हटलं, 'कशासाठी पोस्टमॉर्टेम करायचं?' 'यांना आम्ही आता औषधं दिली, आमचे उपचार कुठे काही चुकले का? किंवा कुठलं औषध यांना लागू झालं नाही? आणि कुठलं औषध द्यायला आम्ही चुकलो का? दुसऱ्या पेशंटला ते उपयोगी पडेल. दुसऱ्या पेशंटला ही चूक केली नाही तर तो कसा वाचेल हे आम्हांला बघायचंय, म्हणून पोस्टमॉर्टम करायचंय.' तर आमच्या नातेवाईकांना हे जेव्हा कळलं - पोस्टमॉर्टेमचं – तेव्हा ते सगळे म्हणाले, 'नाही, हे धर्माच्या विरुद्ध आहे. पोस्टमॉर्टेम करायचं नाही त्या माणसाचं. आम्हांला मयत अशीच द्या.' खूप त्याच्यावर झिकझिक झाली. काय करायचं? त्या वेळी पवारसाहेब बारामतीला, शहासाहेब पुण्याहून निघालेले, नगरकर दिल्लीहून येणार. म्हणजे मी एकटीच होते आणि ह्या सगळ्यांना तोंड द्यायचं. म्हणजे माझं दुःख बाजूला राहिलं आणि हे प्रश्न मिटवण्यात माझा तो वळ जाणार होता. काय माझी परिस्थिती झाली असेल? अशी झिकझिक केल्यानंतर मी म्हटलं, 'नाही, त्यांना करू दे पोस्टमॉर्टेम.' कोणालाही आवडला नाही माझा डिसीजन. तोपर्यंत ते बसून राहिले. पोस्टमॉर्टेम होतंय तर कुठं नेणार मयत याच्यावर वाद झाला होता माझ्याशीच. आपापसात चर्चा करून म्हणाले, भाभीला विचारा. कारण शेवटचा माझाच निर्णय. हॉस्पिटलवाले कुणाला विचारणार? माझंच ऐकणार नं. यांचं थोडंच ऐकणार ते? त्यांना सांगितलेलं होतं, कुणी नसेल तर हिला विचारल्याशिवाय काही करायचं नाही. डॉक्टरनी सांगितल्याशिवाय

मी भरून पावले आहे : १५३