पान:मी भरून पावले आहे.pdf/200

हे पान प्रमाणित केलेले आहे.

असंही नाही. आस्तिक आहोत असंही नाही. असं असताना सुद्धा एवढा प्रसंग येऊनसुद्धा कुणाला एक दगड सुद्धा न लागता ही माणसं परत आली कशी? कोण आहे यांना वाचवणारा? मग असं वाटतं की, आपण वाईट काम केलं नाही तर आपण वाचतोय. कुदरत किंवा निसर्ग कुठं तरी आहे. आणि तो आपल्याला या प्रसंगात मदत करतो. या संबंधात दुसरी गोष्ट अशी सांगण्यासारखी : कराचीला मी दोन वेळा जाऊन आले. तिथे मी बऱ्याच लोकांना पाहिलं. नमाज, पाच टायमाचे नमाज, रोजे, देव-देव करणारी माणसं भेटली. पण त्याचबरोबर ती माणसं स्मगलिंगचं काम करतात, खोटं बोलतात, चीटिंगची कामं करतात, लोकांना फसवतात. तर मी एकदा विचारलं लोकांना, की हे दोन्ही बरोबर कसं जातं? म्हटलं, माझी चांगल्या माणसाची व्याख्या काय सांगते? जो खोटं बोलत नाही, दुसऱ्याचं वाईट चिंतत नाही, भांडत नाही, मग तो देव-देव करणारा असू दे किंवा नसू दे. अल्लाखुदाला मानणारा असू दे किंवा नसू दे. तो नमाज पढणारा असो किंवा नसो. जो आयुष्यात कधीच वाईट काम करत नाही तो माझ्या दृष्टीनं चांगला माणूस. देवाला भजणारा माणूस जर चांगला असं आपण मानत असाल तर त्याच्याबरोबर त्याने वाईट काम केलं तर चालतं का? तर ते म्हणाले, 'वो उसके अमाल है. वो उसका देख लेगा. उसकी सजा उसे वहाँ मिलेगी.' तर हे सुद्धा बरोबर वाटत नाही. आता वर कुणी जाऊन बघितलं आहे का सजा मिळेल का काय? मी म्हणते, आपण या जगात रहातो, तर इथंच आपल्याला सजा का मिळत नाही? पण तसंही होत नाहीये, बघा. काही माणसं इतकी वाईट वागतात. त्यांना शिक्षा होतच नाही आणि जी चांगली माणसं असतात ती झिजून झिजून मरतात. म्हणजे याच्यात सुद्धा अर्थ काय ते मला अजून कळलेलं नाही. याचा मी सारखा विचार करत असते की असं का होतं? आपण बाबा गुन्हा करूच नये. म्हणजे तोबा करण्याचा प्रश्न आपल्याला येणारच नाही. आपल्याला असं वाटलं की इथं खोटं बोलून आपलं काम साधतंय; तरी खोटं बोलायचं नाही. माझं काम नाही झालं तरी चालेल. म्हणून मी म्हणते मी नमाज नाही पढत, रोजा नाही पाळत. पण मी वाईट काम करताना भिते.

 मी व दलवाई एकदा पुण्याला गेलो होतो. पुण्यात अतुर संगतानी म्हणून फार मोठा बिल्डर होता. त्याच्या अनेक बिल्डिंग बनत होत्या. सय्यदभाई ह्यांना म्हणाले, हमीदभाई, तुम्ही आता भाबींचा आणि मुलींचा पुढचा विचार केला पाहिजे. असं कसं चालेल? मी काय करावं असे तुला वाटतं असे दलवाईंनी

मी भरून पावले आहे : १८५