पान:मी भरून पावले आहे.pdf/42

हे पान प्रमाणित केलेले आहे.

पण लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. काकी वयानं मोठ्या असल्यामुळे त्यांना कल्पना आली की हा मुलगा किती खरं बोलतोय, किती खोटं बोलतोय. अनुभवी माणसं होती. त्यांनी परखलं ते, आणि ते म्हणाले की आता तुम्ही ठरवलंच आहे लग्न करायचं, तर तुम्ही दोघं लग्न करा. तारीख ठरवा. लग्न केल्यानंतर तुम्ही आमच्याकडे या. कारण आम्ही जर लग्न लावून दिलं तर आमचं आपसातलं रिलेशन खराब होईल. ते आम्हांला करायचं नाही. तर आम्हांला लग्न लावून द्यायला सांगू नका. पण आमचा आशीर्वाद आहे. एवढं बोलल्यानंतर आम्ही मुंबईला आलो, तारीख ठरवली. १६ जुलै १९५८ रोजी आमचं लग्न धार्मिक पद्धतीनं झालं. मुंबईचे मुख्य काझी मौलवी काझी महंमद हुसेन मुरगे काझी यांनी आमचं लग्न लावलं. साक्षीदार म्हणून महंमदखान जवाहरखान दलवाई आणि कासमखान शाहबाझखान दलवाई होते. रजिस्टर पद्धतीने माझं लग्न ४ ऑगस्ट १९५८ रोजी झालं. त्याला एम. जे. दलवाई, एम. जी. कुलकर्णी आणि जगन्नाथ जाधव हे साक्षीदार म्हणून हजर होते. भेंडीबाजारच्या इथं महंमदअली रोडला त्यांच्या ऑफिसमध्ये लग्न झालं.

 आता यांची सगळी माणसं आमच्या लग्नाला तयार होती. त्यांनी मला सांगितलं, 'अग, मी तुला बघून गेलो. तुला विचारायच्या अगोदर आमच्या गावातल्या प्रत्येक माणसानं तुला बघितलंय. माझा मोठा मामा आहे यूसुफ म्हणून, त्याचं आणि माझं भांडण पण आहे. कैक वर्ष माझ्याशी बोलत नव्हते. आता या वेळी मी त्यांना बोलावणार ना. त्यांना न विचारता गाववाले कसं लग्न माझं करणार? मी त्यांच्या बहिणीचा मुलगा. त्यांनी तुझी खूप तारीफ केलीए आणि आमच्या गावात तर त्यांच्याबद्दल म्हणे असं बोललं जायचं, का उडत्या पाखरांचे पंख मोजणारा माणूस आहे. आणि बायकांच्या फार सहवासात राहिल्यामुळे कुठली बाई कशी आहे हे सांगू शकतो. हा जर म्हणत असेल की मुलगी खूप चांगली आहे, तर खरोखरच ती मुलगी चांगली आहे. काय हरकत नाही तुला लग्न करायला.' असं त्यांनी सांगितल्यावर हे लग्न ठरलं. का तर यांच्या गावामध्ये पूर्वी अशी प्रथा होती की लहानपणातच पाळण्यामध्ये लग्न ठरायचं. तर तसं दलवाईंचंही लग्न ठरलेलं होतं. ती मुलगी नंतर यांनी मला भेटवली. आम्ही गेलो होतो तिच्याकडे. तिचं पण लग्न नंतर झालं. आणि नंतर मग असं बोलायला लागले की याचा सगळा व्यवहार हिंदूंशी चाललेला आहे. हिंदूंमध्ये आहे. याच्या नजरेत सगळे हिंदू मुस्लिम ठरलेत. आता कसली मुसलमान मुलगी आणणार हा. हिंदूच आणणार. ती मुलगी आल्यानंतर आपल्याला बघणार का? असंही होतं. तर माझा फोटो तिथं गेला.

मी भरून पावले आहे : २७