पान:मी भरून पावले आहे.pdf/67

हे पान प्रमाणित केलेले आहे.

माझ्या घरखर्चामध्ये ते जमायचंच नाही. त्यामुळे ते म्हणायचे, 'तू माझ्याचबरोबर कशाला पिक्चरला जातेस? तू एकटी जाऊ शकतेस. काय हरकत आहे मेहरू, जायला? मला वेळ होत नाही. तुला जेव्हा वाटतं तेव्हा तू जात जा. नवऱ्याच्याच बरोबर जायला पाहिजे, असं नाहीए.'

 आम्ही घरामध्ये उर्दू बोलायचो, हे मराठी बोलायचे. का तर माझ्या माहेरी उर्दूच बोलली पाहिजे असं होतं. जसं आत्ताचे मुसलमान बोलतात तसं. मी मराठी शिकलेली नव्हते, त्यांना उर्दूपण येत होतं. पण त्यांच्या डोक्यामध्ये विचार होता की मराठी शिकलंच पाहिजे. कारण त्यांना मराठीचा आदर होता आणि नेहमी मला म्हणायचे की कोणतीही भाषा यायला हवी असेल तर ती बोलायला हवी. एकदा एक दिवस सेन्ससवाले आले आणि त्यांनी सगळी माहिती विचारली. तुमची मदरटंग कुठली? तर यांनी सांगितलं, आमची मदरटंग मराठी. ते लोक गेले आणि हे आत आले आणि म्हणाले, 'मेहरू, आपली मदरटंग आजपासून मराठी. आपण या घरामध्ये मराठीतून बोलायचं. मी म्हणतो म्हणून मराठीतूनच बोलायचं. वाक्य चुकीचं असता कामा नये. तू वाक्य सुधारायचं आणि मगच माझ्याशी बोलायचं. नाहीतर माझ्याशी बोलायचं नाही.' अशा रीतीनं घरात आम्ही मराठी बोलायला लागलो. आवडलं नाही मला पहिल्यांदा. का, तर आपली भाषा उर्दू असताना मराठी का बोलायची? आपण काय धेडमांग आहोत का? हिंदू आहोत का? हे डोक्यात पुरतं बसलेलं.

५२ : मी भरून पावले आहे