पान:मी भरून पावले आहे.pdf/97

हे पान प्रमाणित केलेले आहे.

बोलले नाहीत? मला त्यांच्याकडे यायचं नाही. तर माझ्या ते विनवण्या करायचे, मनवायचे. मी जायला तयार झाले की मग बोलावलेल्या माणसाच्या घराजवळच्या एखाद्या थिएटरमध्ये पिक्चर दाखवायचे. चांगल्या हॉटेलमध्ये खायला घालायचे. आणि मग त्यांच्या घरी मला न्यायचे. मी तिथं जाऊन बोअर होते, त्यांच्या चर्चेत भाग घेऊ शकत नाही ह्याची त्यांना जाणीव होती.
 इंडियन सेक्युलर सोसायटीचे शहासाहेब प्रेसिडेंट होते आणि दलवाई व्हाईस प्रेसिडेंट होते. तेव्हा नगरकर होते. तेसुद्धा थोडी मदत करायचे. नगरकर, शहा हे शरद पवारांचे मित्र. म्हणून पवार ह्यांचे मित्र. असा सगळा मेळ जमला होता. आणि सगळ्यांना वाटायचं का दलवाईंनी हे काम करावं. आणि त्या निमित्तानं हे काम सुरू झालं. तेव्हा ते समाजकार्य करायला लागले. आणि त्यांचं वाचन वाढलं. पुस्तकं जमा करायची. ते झाल्यानंतर मग असा विचार आला, एखादी संघटना उभी करायची का? मग ती कशी करायची? त्याच्यावर बसून डिस्कशन केलं. २२ मार्च १९७० ला मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना भाईंच्या घरी झाली. माडीची खोली होती त्यांची. तिथं जोतिबा फुलेंच्या मंडळावरून नाव ठेवायचं ठरलं. सत्यशोधक समाज ठेवा. पण म्हणजे गोंधळच होतो. कोणी म्हणाले प्रोग्रेसिव्ह मुस्लिम असं हवं. अमूक ठेवा, असं. तर त्यांच्यानंतर हमीद म्हणाले, मुस्लिम सत्यशोधक ठेवा. याच्यावर वाद बराच झाला. मुसलमान यांच्यावर बरेच चिडले. मुस्लिम कशाला? मुसलमानांमध्ये काय हे सत्य शोधणार आहेत? मुस्लिम सोडा. आणि मग सत्यशोधक काय? आणखीन कुणाचं काय? नुसतंच सत्यशोधक याच्याकडे लक्ष वेधलं नसतं. पण मुस्लिम सत्यशोधक ठेवल्याने संघटनेकडे लक्ष वेधलं गेलं आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना झाली.

 मुसलमानांचा दलवाईंच्यावर आरोप होता, की तो आमच्यासमोर येत नाही. आमच्याशी बोलत नाही. आमच्याशी चर्चा करत नाही. तो नुस्ता हिंदूंच्या समोरच बोलतो. तो कोण आहे आमच्यात सुधारणा करणारा? आम्ही त्याला मुसलमानच समजत नाही. त्याला काय अधिकार आहे धर्माविरुद्ध आपली अशी मतं मांडण्याचा? तो कसला सत्यशोधक आहे? त्याचे विचार आम्हांला ऐकून घ्यायचे नाहीत. तो किती शिकलेला आहे? वगैरे... वगैरे... मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना झाली २२ मार्च १९७० या दिवशी. जून महिन्याची गोष्ट आहे. दलवाईंनी असा विचार केला की आपण लीडरांशी बोलायचं नाही. आपण आता सामान्य मुसलमानांशी बोलायचं. त्यांच्यासमोर आपली मतं मांडायची.

८२ : मी भरून पावले आहे