पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/112

हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखातली मुशाफरी

या प्रदेशांत अर्थातच थंडी विशेष होती आणि वायुगतीने जाणाच्या मोटारीमुळे ती अधिक भासली.
  कर्मानशहा हें गांव ऐतिहासिक असून युरोपांतील जर्मन लोकांशीं या नगराचा दूरान्वय जोडतां येतो. बलुचिस्तानच्या बाजूस इराणांत 'कर्मान' म्हणून एक शहर आहे, तेथील शहाने पुरातन काळीं वसविलेलें हें कर्मानशहा गाव आज इराणांतील प्रमुख नगरांत गणलें जातें. कर्मान नांवाचा जर्मनांशीं नामसादृश्यानेच संबंध जडतो असें नव्हे, तर वर्ण व रूपसादृश्यानेही त्या भागचे लोक हे जर्मनांचे पूर्वज असावेत असें कित्येकांचें म्हणणें आहे. तेथील हवापाणी उत्तम असून व्यापारही बराच आहे. राजकीय विभागाचे कर्मानशहा हें राजधानीचें शहर आहे. चोहो बाजूस डोंगरांच्या रांगा असून सुमारे पांच हजार फूट उंचीवर तें वसले आहे. आजूबाजूच्या टेकड्यांवर बर्फ पडलेलें दिसतें. इतकेंच नव्हे तर कधी कधी हिमवृष्टीचा अनुभवही तेथील नागरिकांस मिळतो. रस्त्यावर जेथे पाणी दिसावयाचे तेथे पांढऱ्या काचा लावल्या आहेत की काय अशी भूल पडते. एक दोन तासांच्या आंत सर्व पाणी थिजून घट्ट बनते! कचऱ्याचे ढीग रस्त्याच्या बाजूस असावयाचे त्या ठिकाणी हिमराशी दिसतात.

  डोंगरावर बर्फ कसे दिसते याचे वर्णन करण्यास जन्मसिद्ध कवीच पाहिजे. हिमालयाच्या उत्तुंग शिखरांवरील अक्षय रहाणारे बर्फ शोभादायक असते, तर थोड्या प्रमाणांत हिंवाळ्यांतच पडणाच्या स्वर्गीय गोठलेल्या पाण्याने कर्मानशहाच्या टेकड्यांस विशेष नयनमनोहरता प्राप्त होते हेंही तितकेंच सत्य आहे! लालसर छटा असणाऱ्या वनस्पतिविहीन गिरिपृष्ठभागावर आकाशांतून शुभ्र साखर पडली म्हणजे तेंं दृश्य किती आल्हादकारक दिसेल याची कल्पना करावी.

१०६