पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/122

हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

स्वच्छ पाण्याचे पाट संथपणे अखंडित रीत्या वहात, तेव्हा त्यांकडे पाहूनच समाधान होई. जलप्रवाहाची शोभा वाढविण्यासाठी त्यांच्या खाली निरनिराळ्या रंगांचे दगड घातलेले होते. निळ्या चकाकित दगडांवरून पाट वहात होता, तेव्हा आकाशाचें इतकें स्पष्ट प्रतिबिंब कसें उमटलें याचें आश्चर्य वाटून तत्काल दृष्टि वर जाई. अशा नैसर्गिक शोभेंत जिवंत मानवांच्या चालत्या बोलत्या बाहुल्यांनी भर घातली होती. नटण्यामुरडण्याचा आणि सजण्याचा मक्ता एकट्या स्त्रीजातीसच आहे, अशी ज्या पुरुषांची समजूत असेल त्यांचें मत बदलण्याइतका स्पष्ट पुरावा एका दिवसांत गुलिस्तानमध्ये मिळाला असता. इतर प्रेक्षकांचे पोषाक एकाच काळ्या रंगाचे असले तरी, लष्करी व मुलकी खात्यांतील अधिकाऱ्यांच्या वेषांत सर्व शक्य त्या रंगांचें मीलन झालेलें दृष्टोत्पत्तीस येई.

 राजदर्शनाला केवळ प्रजाजनांनीच यावयाचें नसतें, तर इतर स्वतंत्र राष्ट्रांचे प्रतिनिधीही आपल्या सर्व सरंजामानिशी सजून येतात. हिंदी पोषाकाच्या विचित्रतेस हसणाऱ्या युरोपियनांनी इतके हास्यास्पद प्रकार राष्ट्रीय वेषांत करून त्यांचें बंधन कडक रीतीने पाळावे हे पाहून साश्चर्य कुतूहल वाटले. विशेषत: इंग्रज व इटालियन प्रतिनिधींचे पोषाक प्रेक्षणीय होते. त्यांच्या होडीच्या आकाराच्या लांबट टोप्या, त्यांवर असलेली पिसे, त्यांचे पुढे आंखूड पण मागे गुडघ्यापर्यंत लोंबणारे कोट, त्यांवरील सुवर्णतंतूंची नक्षी, खांद्यावर, मानेभोवती आणि वक्षःस्थलावर काढलेली वेलबुट्टी, विजारीच्या बाहेरच्या बाजूस रुंद सोनेरी पट्टी, बुटाखालून नेलेला तिचा भाग इत्यादि सर्वच प्रकार आम्हा हिंदवासियांनाच नव्हे तर, अखिल पौर्वात्यांना हसू आणणारा होता. हृदयस्थानावर लटकणारे बिल्ले सोन्यारुप्यांंचे

११६