पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/134

हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

तो प्रथम करील आणि पुनः माप तोंडाला लावील! किंवा दूध तापलेलें असेल तर वर आलेली साय एका बोटाने चाखीत पुनः पुनः बोट दुधाच्या भांड्यात घालून (कोणचा हात तें विचारूंं नका) तो तुमच्याशीं बोलेल, तुम्हांला दूधही मोजून देईल. सर्वच कार्य अगदी निर्विकारपणे चालेल! उदाहरणार्थ दुसरी एक गोष्ट घ्या. टरोगान' म्हणून तुपासारखा पदार्थ इराणांत चोहोकडे मिळतो. त्याचा उपयोग भातावर, तळणीसाठी किंवा रोटीबरोबर खाण्याकडे करतात. त्याच्या वासावरून ती निव्वळ चरबी असावी असे वाटते. 'रोगान' याचा अर्थही चरबी असा आहे. पण ती चरबी ज्या जनावराच्या मांसापासून काढलेली असते त्याचेंच कातडे-केस न काढलेलें-जसेंच्या तसेंच घेऊन त्याची पिशवी करून त्यांत तें रोगान भरतात. पिशवी करावयाची म्हणजे काय? भराभर टाके घालून किंवा झोळी बांधतात तशा गाठी देऊन तें कातडें भरावयाचें! घाणेरडे केस बाहेरच्या बाजूस तसेच दिसत असतात. पण त्यांतील 'तूप' अगदी बिनदिक्कतपणे सर्वत्र वापरलें जातें. इतकेंच नव्हे, तर आणखीही तसलेच पदार्थ अशा कातड्यांत भरून किती तरी विकावयास येतात. पाणीवाला भिस्ती ज्यांतून 'पेय' आणतो ती पिशवीही अशीच असते. तें कातडें कधी जन्मांतरी धुतात की नाही देव जाणे! पण त्यांतील पाणी सर्वत्र पितात. निढवलेल्या इराण्यांना त्याचें कांहीच वाटत नाही. दृष्टीआड सृष्टि असती तर एक वेळ चालेल; पण सर्वच प्रकार राजरोसपणे समोर होत असल्याने कोठेही जाऊन आहार करावा किंवा तहान भागविण्यासाठी पाणी प्यावें अशी इच्छा बिलकुल होत नाही. नाही म्हणावयास चारदोन साहेबी उपाहारगृहें आहेत, त्यांच्यावरच सर्वस्वी अवलंबून येथे वास्तव्य करावें लागलें.

१२८