पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/141

हे पान प्रमाणित केलेले आहे.

धूम्रपानांतही स्वावलंबन

हया बोगद्यांत शिरल्यावर एकदीड मैल आकाशाचें दर्शन न होतां गर्दीतूनच जावें लागतें! सर्व प्रकारची दुकानें व्यवस्थित रीतीने मांडलेलीं आढळतात. वेगवेगळ्या धंद्यांची विभागणी केलेली दिसते. दिवसा दिवे लावण्याची पाळी येत असली तरी व्यापार अगदी जोराने चाललेला असतो. जगांतील सर्व प्रदेशांचा माल इराणांत भरलेला आहे हें पाहून आश्चर्य वाटते. कारण एवढ्या मोठ्या देशांत केवळ शंभर मैल देखील रेल्वेचा प्रसार अद्याप झाला नाही! सर्व दळणवळण मोटारी, घोडे, खेचरें आणि उंट यांवरून चालतें. या बंद बाजारी पद्धतीमुळे लोकांत क्षयरोगाचा प्रसार आहे असें म्हणतात.
 धूम्रपानाचे व्यसन हिंदुस्थानांतील लोकांना जितकें आहे, त्यापेक्षा किंचित् कमी प्रमाणांत तें इराणांत आहे. मुख्यतः समाधानाची गोष्ट अशी की, इराणी जनता बहुतेक सिगारेट्स इराणांतच तयार करते. परकीय 'धुम्रसमिधां'चा प्रसार इराणांत मुळीच नाही, असें म्हणता येईल. ठिकठिकाणी सिगारेट्स तयार करण्याचीं हातयंत्रें दिसतात आणि कित्येकांना स्वहस्तें सिगारेट करून पिण्याची सवय असल्याने सुटे कागद व तंबाखू हीं खेडोखेडींही मिळतात. गुडगुडी सुद्धा क्वचित प्रसंगीं दृष्टोत्पत्तीस येते. अफू ओढण्याचें घातुक व्यसन दोन तीन वर्षांपूर्वी फारच पसरलेलें होतें. तें राष्ट्रसंघाच्या विनंतीवरून बंद होण्याच्या मार्गाला लागलें आहे. रोट्यांना ‘खसखस' लावण्याच्या नेहमीच्या चालीवरून अफूचें पीक येथे पुष्कळ असावें असा तर्क निघतो व तो खराही आहे. स्त्रियाही बुरख्यांतून धूर सोडीत रस्यांतून जातात, त्याचे प्रथम दर्शनी आश्चर्य वाटतें!

 शिराझ शहरांतील 'मदिरा' उमर खय्यामने नामांकित करून ठेवली आहे. द्राक्षांचे पीक विपुल असल्याने 'सुरासुरांचा चुरा

१३५