पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/166

हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

थंडीत क्वेट्टयास सुमारे चार महिने बर्फ असते. आणि तज्जन्य होणारा त्रास मनांत ठेवला नाही तर दिसणारी शोभा अवर्णनीय असते.
 क्वेट्टा हे नांव इंग्रजी भाषापटूंनी अपभ्रष्ट केलें आहे. मूळचें नांव 'शाल' असें होतें. म्हणजे अंगावर घेण्याची शाल जशी सुंदर दिसते तसेंच हें नगर हिरव्या वृक्षराजीने विभूषित झालें म्हणजे रम्य दिसे. पूर्वी अफगाणिस्तानचा ताबा क्वेट्टयावर होता आणि अठराव्या शतकाच्या अखेरीस अफगाण अमिराची व बलुचिस्तानच्या खानाची सोयरिक झाली, त्या वेळी क्वेट्टा आंदण म्हणून कलाताधिपास मिळालें. 'क्वाता' म्हणजे किल्ला असा अर्थ तद्देशीय भाषेत आहे. 'शाल कोट' म्हणजे शाल किल्ला असें चांगलें नांव असतां शाल कोणी तरी हिरावून घेतली आणि लोक नुसते 'क्वाता' 'क्वाता' करू लागले. त्याचा इंग्रजी सोजिरांनी क्वेट्टा असा विपर्यास केला! हिंदींत आज 'कोइटा' असेंच लिहितात.
  क्वेट्टा येथे हुमायून दिल्लीहून पळून निघाला तेव्हा आला होता. अकबर बादशहा येथे असतांना एक दीड वर्षाचा होता. त्याला आपल्या नातलगाकडे ठेवून पळपुटे मोंगल बादशहा पुढे गेले !

 सर्व बलुचिस्तानची व्यवस्था ब्रिटिशच पहातात असें म्हणतां येतें. हिंदुस्थानचें प्रवेशद्वार म्हणून या प्रांताचें विशेष महत्त्व ओळखून इंग्रज मुत्सद्दयांनी तो पटकावला आहे. याच्याही पुढे जाऊन कंदाहार इंग्रजी अमलाखाली असणें हिंदुस्थानच्या संरक्षणाच्या दृष्टीने आवश्यक आहे असें प्रतिपादण्यापर्यंत कांही व्हाइसरॉयांची मजल गेली होती! आणि स्टेटसेक्रेटरींनी नको म्हणून आज्ञा दिल्यामुळे व पुनः पुनः बजावल्यामुळे कंदाहार ताब्यांत आलेलें अफगाण अमिरास परत द्यावें लागलें!

१६०