पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/186

हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

व्यसनांत ‘सहधर्मचारिणी'ही भाग घेतेच. अर्भकें लहान असलीं तरी त्यांच्या तोंडावर अफूचा धूर सोडून मातापितरें पंक्तिप्रपंचाच्या दोषांतून मुक्त होतात. अफू ओढणें हें वाईट व्यसन असल्याची जाणीव इराणी जनतेला अलीकडेच होऊं लागली आहे.
 एक तुर्कोमान यात्रेकरू हें सर्व बोलणें मोठ्या उत्सुकतेने ऐकत होता. त्याला हिंदुस्थानबद्दल आपणांस काय वाटतें तें बोलून दाखविण्याची उत्कट इच्छा असल्याचें चळवळ करणाऱ्या ओठांवरून दिसे. परंतु त्याला फारसी चांगलें येत नव्हते. “अफेंदिम्, तुर्की बिलेर्शेम्?? (काय राव, तुर्की बोलतां की नाही?) असें त्याने मला विचारलें. खुणेने नाही म्हणून "फार्सी मिदानीम्" (फार्सी मला कळतें) असें मी सांगतांच मोडक्या तोडक्या भाषेंत हातवारे करून तो बोलूं लागला.
 तुमच्या हिंदुस्थानांत खजूर फार चांगला होतो. मी बगदादला खाल्ला. एवढा लांब होता आणि त्यांत बी मुळीच नव्हती. तो लोण्याप्रमाणें मऊ आणि पांढरा दिसत असे. वर पिवळट कांही तरी होते. फार फार नामी. मला तर पुष्कळ आवडला. मी बगदादला पोटभर खाल्ला." मिटक्या मारून वर्णन चाललेले पाहून इतरांच्या तोंडाला पाणी सुटलें. हे कसलें फळ? खजूर आणि त्यांत बी नाहीं? पांढरा कसा काय ? इत्यादि शंका त्यांना येऊ लागल्या. हें फळ ओळखण्यास मलाही डोके खाजवावें लागलें. 'बगदाद'चे नांव त्यानें घेतलें नसतें तर तर्कशक्ति खुंटली असती. कारण बगदादला हिंदुस्थानांतून येणाऱ्या केळ्यावर किती उड्या पडतात तें पाहिलें असल्याने तुर्कोमानाचा 'पांढरा बिनबियांचा खजूर ' म्हणजे केळींच हें दीर्घ विचारान्ती निश्चितपणें उमगतां आलें.

  *
*
१८०