पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/24

हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

चांगलें ठरतें आणि त्याच्या शक्तीप्रमाणे त्याला वेतन मिळतें, मोठमोठ्या चोऱ्या करणारा इसम महिनाभर ‘स्वस्थ' बसला तर त्याला अधिक वेतन मिळतें. अशा तऱ्हेची व्यवस्था टोळीच्या नायकांच्या वतीने केली जाते आणि त्यांना ‘सद्वर्तनाचें पारितोषिक' मिळतें.
 याच्या उलट एखाद्या टोळीपैकी कोणी इसमाने कांही गुन्हा केला असला तर सर्व टोळीला जबाबदार धरलें जातें आणि त्याच्या म्होरक्याला त्याचा तपास लावून देण्याविषयी आज्ञा होते. तपास लागला नाही तर त्या कंपूस कांही तरी दंड ठोठावण्यांत येतो आणि मासिक वेतनांतून किंवा अन्य मार्गाने तो वसूल करतात. कलागती लावून आपला कार्यभाग साधण्याची राजनीति येथे पुष्कळ वेळां लागू केलेली आढळते. कारण सरहद्दीवरील या लोकांमध्ये नेहमी भांडणें चालू असतात. राहतां राहिला तिसरा भाग वजिरिस्तानचा. तो मात्र अत्यंत कणखर व त्रासदायक प्रांत आहे. हिंदी फौज रात्री बारा वाजतांही लढाईसाठी तयार असते ती याच लोकांच्या भीतीमुळे. ब्रिटिशांनाही या लबाड लोकांपुढे हात टेकावे लागले आहेत. येवढ्याच टापूंत लढवय्ये निदान ३०,००० असावेत असा सरकारी अंदाज आहे! आणि हे योद्धे अत्यंत कडवे, क्रूर व कमालीचे शूर! त्यांचा नेम अगदी अचूक असून आधुनिक विलायती रायफल्स व पिस्तुलें त्यांचे जवळ सदैव असतात. त्यांना शांततेचे वावडें आहे. सधन व समृद्ध देशांत लटालूट करावी हीच त्यांची अत्युच्च आकांक्षा. अशा लोकांना कोणत्याही मार्गाने कह्यांत ठेवणें म्हणजे निखाऱ्याची मोट बांधण्यासारखेच आहे!

 वजिरी लोकांचा त्रास ब्रिटिश राज्यकर्त्यांना किती आहे याची कल्पना खालील आकड्यांवरून येईल. इ. स. १९१९ सालीं

१८