पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/51

हे पान प्रमाणित केलेले आहे.

भेदाभेदांचा विसर

ही शोचनीय स्थिति आहे खरी. परंतु आपल्या जन्मभूमीची सीमा ओलांडून जरा बाहेर येतांच मनावर काय परिणाम घडून येतो तो लक्षांत घेण्यासारखा आहे. बसऱ्याचेंच उदाहरण देऊन असें सांगतां येईल की, येथे आल्यापासून मुसलमान, खिश्चन, बंगाली व मद्रासी अशा सर्व प्रकारच्या हिंदी गृहस्थांनी इतक्या मोकळेपणाने आणि आपुलकीच्या भावनेने स्वागत केलें की, ही वृत्ति आंगीं बाणण्यासाठी तरी सर्व हिंदी मंडळींनी एकदा परदेशगमन करावें असें वाटतें ! आपण सर्व हिंदमातेचीं मुलें आहोंत, आपणा सर्वांचीं सुखदुःखें एकच आहेत, ही जाणीव झालेली स्पष्टपणें दिसून येते. आणि हें मनांत बिंबल्यावर देशोद्धाराला काय उशीर ? भिन्न भाषा व निरनिराळ्या जाती पोटजाती असूनही हिंदी प्रजेची एकी होऊं शकते हे दर्शविण्यास येथील उदाहरण पुरेसें आहे.

 लोकमान्य टिळकांवरील अलोट भक्ति–-कै. लोकमान्य टिळकांची योग्यता किती मोठी होती आणि राजकारणांत त्यांचे कार्य केवढें झालें आहे हें आता हिंदी प्रजेस ठाऊक असलें तरी इकडील प्रदेशांत रहाणाऱ्या एका खिश्चन गृहस्थाचें मत श्रवणीय, नव्हे वाचनीय आहे. "आजच्या हिंदी राजकारणाला प्राप्त झालेल्या महत्त्वाचें आदिकारण टिळक होत. हिंदुस्थानांतील खरे मुत्सद्दी तेच होत. महात्मा गांधींस फार तर मोठे साधु पुरुष म्हणतां येईल. पण राजकारणाचें वास्तविक ज्ञान त्यांना नाही असेंच म्हणावें लागेल." इत्यादि आशयाचें बोलणें ऐकून त्या गृहस्थाचे कौतुक करावें का आपल्या महाराष्ट्रांतील अत्यंत दैदीप्यमान अशा नररत्नाची थोरवी मुक्तकंठाने वानावी असें कोडें पडलें ! इराणांत वास्तव्य करीत असलेल्या एका महाराष्ट्रीय स्थापत्यविशारदाचें प्रातःकालीन वंदन

४५