या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


मग ती प्रेसमध्ये दाबीत असत, ह्मणजे तिच्यांतील पातळ पदार्थ बाहेर निघून बन्याच घट्ट पदार्थाचा गोळा प्रेसमध्ये जमतो, त्याच्या मेणबत्त्या बनवीत असत. त्या घट्ट पदार्थात ग्लिसराईन व बरेंच ओलिईनही रहात असल्यामुळे, त्यापासून बनविलेल्या मेणबत्त्यांचा प्रकाश चांगला पडत नसे. त्या मेणबत्त्या, तो घट्ट पदार्थ ऊन करून त्यांत वाती बुचकळून तयार कराव्या लागत. हल्लीप्रमाणे ओतीव मेणबत्त्या त्यापासून करता येत नव्हत्या.
 निरनिराळ्या आकारांचे व सोईचे दिवे, कंदील व चिमण्या आणि स्टिअरीक आसिडाच्या मेणबत्या करण्याच्या कामी फ्रेंच लोकांनी सर्वांत आघाडी मारली आहे.
 शिचरडीबीच यांणी ओतीव मेणबत्या काढल्या, क्यांबेसर्स यांणी दुहेरी विणलेल्या वातीची कल्पना काढली; आगोड व कारसेल यांणी निरनिराळ्या प्रकारचे दिवे काढले; आणि सर्वात मोठा रसायनज्ञ जो चिव्हरल त्याने स्टिअरिक आसीड शोधून काढले. हे सर्व फ्रेंच लोकच होते, फ्रान्समध्ये ज्या दोन मोठ्या राज्यक्रांत्या झाल्या त्या दोहोंच्या मधल्या वेळांतच फ्रेंच लोकांनी हे मोठे मोठे शोध लावले.
 मिशनरी लोकांच्या परिश्रमाने व पार्लमेन्टच्या कायद्यांनी जें सुख किंवा त्याची साधने समाजास मिळाली त्यापेक्षां चिव्हरल साहेबांच्या शोधांनी मानवी समाज फार अधिक सुखी झाला असे एका ग्रंथकाराने मटले आहे, ते खरे आहे.
 सन १८११ मध्ये चिव्हरल साहेबांनी स्निग्धपदार्थाच्या घटकांचा शोध करण्यास सुरुवात केली. १८१३ मध्ये त्यांचा पहिला शोध बाहेर पडला. त्या शोधाची माहिती खाली लिहिल्याप्रमाणे आहे.
 " स्निग्ध पदार्थ संयुक्त घटकाचे बनलेले आहेत. बकऱ्याची व डुकराची चरबी आणि इतर स्निग्ध पदार्थ शुद्ध घटकांचे बनलेले नाहीत.