पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/26

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


शंकराचार्यांचे पात्र
  या विवेचनाचा हेतू हा की 'शारदेची' संविधानक-रचना करताना देवल काळजीपूर्वक काय करताहेत इकडे लक्ष वेधावे. लग्न ठरावे. बिनतोडपणे मोडावे आणि तितक्याच पक्क्या पद्धतीने अनुरूप वरप्राप्ती व्हावी, हे सूत्र मनाशी बाळगून देवल कथानकाचा तपशील भरीत निघालेले आहेत. हा तपशील भरण्यासाठी त्यांना एक एक अपवादभूत परिस्थिती निर्माण करावी लागली आहे. ज्या प्रमाणात अशी. अपवादभूत परिस्थिती निर्माण करून देवल कथानकाला सुसंगत व रेखीव करण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्या प्रमाणात या नाटकातील वास्तवता व समस्येचे प्रातिनिधिक रूप दोन्ही मावळत असून सोयीस्कर कल्पिताचा पसारा तेथे वाढत चाललेला आहे.
  सुखी शेवटासाठी एक तरुण, कुलीन असा कोदंड या नाटकात असणे भाग होते, तो जुळणाऱ्या गोत्राचा आणि अविवाहित ठेवणे भाग होते. कोदंड कुलीन आहे. तरुण आहे. देखणा आहे. शहाणा ब्राह्मण आहे. या परिस्थितीत हे असे राजबिंडे अपत्य अविवाहित राहणे शक्य नव्हते. देवलांनी त्याहीसाठी एक बिनतोड युक्ती हुडकून काढली आहे. ज्या काळात देवल वावरत होते, त्या काळात ही यक्ती बिनतोड वाटली असेल-आज ती हास्यास्पद वाटते. देवलांनी कोदंडाला करवीर-पीठाच्या शंकराचार्यांचा शिष्य बनवलेले आहे. देवलांनी या ठिकाणी शंकराचार्य करवीरपीठाचे घेतले, याचे कारण अगदी साधे होते. करवीरपीठ हे मोठे सधारक होते असे नाही. सर्वांच्याचइतके ते कडवे परंपरावादी होते. पण महाराष्ट्र करवीरपीठाच्या कक्षेत मोडतो, याला देवलांचा इलाज नव्हता. शंकराचार्यांच्या आज्ञेनुसार कोदंड तीन वर्षे अविवाहित राहून धर्मसुधारणेचा प्रचार करीत हिंडतो आहे. धर्मसुधारणांचा प्रचार करण्यासाठी विशीतली कोवळी पोरे हिंडत नसतात, इकडे लक्ष द्यायला देवलांना उसंत सापडणे शक्य नव्हते.
  भारताच्या इतिहासात शंकराचार्यांची गादी सनातनित्वासाठी प्रसिद्ध आहे. श्रुति-स्मृति-पुराणोक्त हिंदू धर्माचे संरक्षण आणि धर्मप्रचार, परंपरागत धर्माविरुद्ध वागणाऱ्यांना धर्मशासन करणे म्हणजे बहिष्कृत करणे व अद्वैत वेदान्ताचा पुरस्कार ही शंकराचार्यांच्या पीठांची परंपरेने चालत आलेली तीन वैशिष्ट्ये

देवलांची शारदा / २५