पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/42

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आणि अशी सवलत देताना आता तुम्ही अनुकरणीय राहिलेला नाहीत असेही बजावीत आहेत. बौद्धिक साहचर्य व प्रेमविलासासाठी गणिकासहवास अगदी स्वाभाविक समजणाऱ्या पुरुषाचे स्त्री वर्गाविषयी हे मत आहे. आमच्या सुधारक वर्गाला सुधारणा हव्या होत्या यात वाद नाही; पण मनाने पुरोगामी किती होते व नाईलाजे आपल्या सनातनीपणात तडजोड करण्यास तयार झालेले किती होते ह्याचा एकदा बारकाईने शोधच घ्यावा लागेल.

चालीरीतींवरील टीका
 कोल्हटकरांना धर्माबद्दल फारशी आस्था नाही. त्यांना भूतकाळाविषयी श्रद्धाही फारशी नाही. भविष्यकाळासाठी जिद्द नाही. याकडे लक्ष वेधून करंदीकर म्हणतात, अशा समीक्षकाला वर्तमान व भूताचा उपहास व भविष्यासाठी अद्भूत कल्पनाविलास यापेक्षा अधिक काय करता येणार होते. तेवढे कोल्हटकरांनी केलेले आहे. हा निर्णय कठोर आहे; पण फारसा चुकला आहे असे म्हणायची सोय नाही. म्हातारपणी आयुष्याच्या अखेरीस कोल्हटकरांना असेही वाटू लागले की, आपण जुन्या चालीरीतींवर फार मोठी टीका केली ती चूक झाली. खरे म्हणजे हिंदू परंपरेच्या महत्त्वाच्या भागावर कोल्हटकरांची टीका फारशी जहाल नाही. त्यांचा आक्षेप समाजरचनेवर नसून काही चालीरीतींवर आहे. ज्या चालीरीतींची त्यांनी टर उडविली आहे, त्या लोकप्रिय असल्या तरी धर्ममान्य होत्याच असे नाही. तरीही आपली चूक झाली असे त्यांना वाटते. माफक प्रश्नावर प्रथम माफक लिहायचे. आचारांची जबाबदारी घ्यायचीच नाही व जे माफक लिहिले तेही चुकले असे वाटायचे. ही लक्षणे फार पुरोगामी नाहीत हे उघड आहे.

स्वप्नाळूपणा व स्वप्नरंजन
  कोल्हटकरांच्या वाङ्मयात स्वप्नाळूपणा व स्वप्नरंजन पुष्कळ आहे. त्यामुळे वास्तववादाचा फारसा प्रश्न नाहीच. त्यांच्या वाङ्मयात खरे असण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही, तसा खरे वाटण्याचाही प्रश्न उपस्थित होत नाही, पण निदान वाङ्मयाच्या या रूपाचे तात्त्विक समर्थन नसावे. पण तेही कोल्हटकर करतात. सौंदर्य आणि सद्गुण यांचे कल्पनासृष्टीत इतके साहचर्य असते की कुरूप स्त्रीच्या अंगी सद्गुण असण्याची कल्पनाच आपल्याला सहन होत नाही

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर : साहित्य आणि संप्रदाय / ४१