पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/47

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण३रे





हिराबाई पेडणेकर : एक टिपण



 श्रीपाद कृष्ण कोल्हटकर आणि कै. हिराबाई पेडणेकर यांचा परस्परसंबंध हा मराठी वाङ्मयाच्या जगात कुतूहलाचा, चर्चेचा असा तर विषय ठरलाच; पण तो वसंत कानेटकरांसारख्या ज्येष्ठ नाटककाराने हाताळून कलाकृतीचा आणि नाटकाचासुद्धा विषय बनविलेला आहे. डॉ. श्रीराम लागू यांच्या वैविध्याने नटलेल्या समृद्ध अभिनयकौशल्याचे एक ठिकाण म्हणून या विषयावर लिहिलेले वसंत कानेटकरांचे 'कस्तरीमग' हे नाटक उल्लेखावे लागेल.
  श्री. ग. त्र्यं. माडखोलकर या विषयावर लिहिण्यासाठी दीर्घकाळपर्यंत उत्सुक होते. त्यांचे वाङ्मयगुरू श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. ते हयात असेपर्यंत म्हणजे इ.स. १९३४ पर्यंत या विषयावर त्यांना काही लिहिणे शक्य नव्हते. कोल्हटकरांच्या निधनाला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर आणि सर्व पात्रे इतिहासजमा झाल्यानंतर या विषयावर लिहिण्यास माडखोलकर मोकळे झाले. इ.स. १९६२ साली गुर्जरांचे निधन झाले. ही संधी साधून गुर्जरांच्यावर लिहिलेल्या मृत्युलेखात इ.स. १९६२ साली माडखोलकरांनी हिराबाईंचा तपशिलाने नामनिर्देश केला. या वेळी हिराबाई कदाचित हयात असाव्यात असे त्यांनी गृहित धरले होते. पुढे शोध घेताना ही गोष्ट लक्षात आली की हिराबाईंच्या मृत्यूलाही आता सुमारे एक तप उलटलेले आहे. माडखोलकरांचा हा लेख सर्वत्र फार मोठे कुतुहल निर्माण करणारा ठरला. यानंतर काही काळाने मामा वरेरकरांनी हिराबाईंच्या विषयी लिहिले. याच काळात हिराबाईंचे शेवटचे यजमान नेने हेही इ.स. १९६२ साली वारले. १९६२-६३ पासून वाढत आलेली जिज्ञासा पुढे इ.स. १९६९ साली म.ल. वहाडपांडे यांच्या पुस्तकाच्या रूपाने

४६ / रंगविमर्श