पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/48

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

फलद्रूप झालेली आहे. शक्य ती सर्व माहिती वऱ्हाडपांडे यांनी संग्रहित केलेली आहे.

स्वप्नाळू कवयित्रीचा दारुण अपेक्षाभंग
  या संग्रहाला माडखोलकरांची प्रदीर्घ अशी प्रस्तावना आहे. प्रायः सर्व संबंधित काळाच्या आड गेल्यानंतर आणि आज शक्य आहे ती माहिती उपलब्ध झाल्यानंतर हिराबाई आणि कोल्हटकर यांच्या सर्व प्रकरणाचाच थोडा तटस्थपणे आणि चिकित्सक असा विचार केला पाहिजे. आरंभीच्या काळात आपण काहीतरी लोकविलक्षण आणि कुतुहलजनक गुप्त माहिती उजेडात आणतो आहोत, या बाबतचे फार मोठे कुतुहल सर्वांच्या मनात असते. एखादा चोरटा प्रेमसंबंध लक्षात आला की माणसे उत्साहाने त्याची चर्चा करतात. ही चर्चा करीत असताना त्यात आपल्या कुतुहलाचे आणि आपल्या कल्पनेचे अनेक रंग मिसळत असतात. डोळ्यांसमोर असणाऱ्या घटना नीटपणे समजून घेण्याऐवजी या सर्व घटनांना एखादे काव्यमय स्पष्टीकरण देता येईल काय याची धडपड कलावंताच्या मनामध्ये सुरू होते. या दृष्टीने वसंत कानेटकरांनी हिराबाईंच्या जीवनाला 'असोशीने प्रेमाचा शोध घेणाऱ्या एका हळव्या आणि स्वप्नाळू कवयित्रीचे आणि तिला जो दारुण अपेक्षाभंग भोगावा लागला त्याचे - म्हणजे हळव्या, स्वप्नवेड्या आणि भाबड्या पण बुद्धिमान व्यक्तिमत्त्वाच्या शोकांतिकेचे' रूप दिले आहे. पुष्कळदा असे दिसून येते की आपण आपल्याच कल्पना इतरांच्या जीवनात वाचतो आहोत.

कथा अज्ञात नव्हती
  तसे पाहिले तर हिराबाईंची कथा काही गुप्त होती असे मानण्याचे कारण नाही. स्वतः हिराबाई पेडणेकर या नाटककार होत्या. पुस्तकरूपाने त्यांची नाटके प्रकाशित झालेली होती. 'ललितकलादर्श'सारख्या मान्यवर नाट्यसंस्थेने आणि केशवराव भोसले यांच्यासारख्या विख्यात नटाने हिराबाईंच्या नाटकाचे प्रयोग सादर केलेले होते. हिराबाई गायिका म्हणून प्रसिद्ध होत्या. अनेकांचे त्यांच्याकडे जाणे-येणे असे. गडकरी, गुर्जर, ठोंबरे, वरेरकर इत्यादींना हिराबाईंची कहाणी माहीतच होती. साहित्यिकांच्या वर्तुळात ती चर्चेचा विषय होती. कोल्हटकर हिराबाईंच्याकडे चोरून जात नव्हते, उघड जात होते. काही दिवस कोल्हटकरांनी

हिराबाई पेडणेकर : एक टिपण/ ४७