पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/49

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हिराबाईंना आपल्याकडे नेऊन ठेवले होते. यामुळे साहित्यिक वर्तुळात अनेकांना ज्ञात, पण जाहीर रीतीने चर्चा मात्र करावयाची नाही असा संकेत असणारी ही कथा होती. माडखोलकरांनी ही कथा जाहीर कथेचा विषय केली एवढेच काय ते. यामुळे या कथेला भलते स्वप्नांचे रंग दिलेच पाहिजेत अशी अपूर्वाई मानण्याची गरज वाटत नाही.
  प्रारंभीचे कुतुहल संपल्यानंतर आता आपण अलिप्तपणे व थंडपणे या कहाणीचा वास्तवनिष्ठ विचार करू शकतो. काव्यातील रमणीयतेला आणि स्वप्नाळूपणाला एक महत्त्व आहेच, पण त्याबरोबरच वास्तवालाही आपण सामोरे गेले पाहिजे. काही कथेत वास्तव सत्याचे महत्त्व कवितेहून अधिक तर काही कथेत स्वपांचे महत्त्व सत्याहून अधिक असे मानायला आपण शिकले पाहिजे.

व्यक्तीची सुटी कहाणी
 हिराबाईंचा विचार करताना ती एका व्यक्तीची सुटी कहाणी आहे ही समजूतच आपण सोडून दिली पाहिजे. कुणाला आवडो अगर नावडो- एक वास्तव असे आहे की, हिंदू समाजरचनेत काही जातीजमाती या गणिका व्यवसाय करण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या होत्या. या जातीजमाती सर्व भारतभर कलावंत जातीजमाती म्हणून ओळखल्या जातात. तुम्ही शब्द 'कलावंत' वापरा, अगर 'गणिका' वापरा वा ओबडधोबड 'वेश्या' असा वापरा; शब्द कोणताही वापरलात तरी आशयात त्यामुळे फारसा फरक पडत नाही. फार तर आपण हा सरंजामशाही मनोवृत्तीच्या हिंदू समाजरचनेच्या क्रौर्याचा हा भाग आहे असे पाहिजे तर म्हणू शकू; पण जगभर वंशपरंपरेने गणिका व्यवसाय करणाऱ्या जातीजमाती प्राचीन जगात सर्वत्रच अस्तित्वात होत्या हे वास्तव आहे. या जमातीतील काही स्त्रिया देवाच्या नावे सोडलेल्या असत. देवळात नृत्यगायन करणे हेच या स्त्रियांचे जीवन होते. या स्त्रिया देवदासी अगर भावीणी म्हणून ओळखल्या जात. नृत्यगायनाद्वारे ईश्वराची उपासना आणि सेवा हा यांचा जाहीर सर्वमान्य धंदा होता. या व्यवसायासह देहविक्रय हा सर्वांना माहीत असलेला, पण ज्याचा उच्चार करावयाचा नाही असा सर्वज्ञात धंदा होता. या समाजातील काही स्त्रिया कुणाकडे तरी जन्मभर रखेली म्हणून राहत. एखादा यजमान

४८/ रंगविमर्श