पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/71

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खलपुरुषावर विदूषक होण्याची जबाबदारी टाकलेली नव्हती. खाडिलकरांनी ही पद्धत कोल्हटकरांपासून उचलली आहे असे मला वाटते. ज्या ठिकाणी खाडिलकर या भानगडीत पडत नाहीत आणि सरळ द्रौपदीच्या विरोधी कीचक उभा करतात आणि कीचकालाही एक तात्त्विक संगती व अधिष्ठान देतात, त्या ठिकाणी खाडिलकरांची प्रतिभा मोठ्या वैभवात असताना दिसते. जिथे असे तात्त्विक अधिष्ठान खाडिलकरांना पुरविता येत नाही तिथे खाडिलकरांचे नाटक कोसळू लागते. खाडिलकरांचे नाटक हे व्यक्तीचे नाटकच नव्हे. ते प्रतिनिधीचे नाटक आहे. कीचक जेत्यांच्या अहंभावाचा प्रतिनिधी व्हावा, द्रौपदीत जितांचा स्वाभिमान उसळून यावा, धर्माने तडजोडवादी व्हावे, विराट, सुदेष्णा, रत्नप्रभा यांचेही नमुने (टाइप्स) व्हावेत म्हणजे खाडिलकरांचे नाटक बहरून येते. खाडिलकरांची नाटके हा शब्द उच्चारताच त्यांची प्रभावी पात्रसृष्टी डोळ्यांसमोर येते ही गोष्ट खरी, पण ही पात्रे व्यक्ती म्हणून जिवंत होत नाहीत, नमुना म्हणून प्रकाशमान होतात ही दुसरी गोष्ट खरी आहे.

भडकनाट्याकडे आरंभापासून ओढा
 खाडिलकरांचे मूल्यमापन करताना अजून काही गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतात. त्यांतील एक म्हणजे भडकनाट्याकडे (मेलोड्रामाकडे) आरंभापासून त्यांच्या मनाचा एक कल होता. 'कीचकवध', 'भाऊबंदकी' लिहितानाच 'बायकांचे बंड' त्यांनी लिहून टाकले. 'मानापमान' लिहिण्याच्या आधी 'प्रेमध्वज' ही त्यांनी लिहून पाहिला, जणू ‘बायकांचे बंड' आणि 'प्रेमध्वज' या नाटकांमधून खाडिलकर 'मानापमान' ची पूर्वतयारी करीत होते. 'मानापमान' लिहीपावेतो संगीत नाटकाकडे खाडिलकरांचे लक्ष गेले नव्हते. ही माहिती देतानाच आरंभापासूनच खाडिलकर एकीकडे 'कीचकवध', 'बायकांचे बंड' लिहिण्याचा प्रयत्न करीत होते. ही बाबही आपण नोंदविली पाहिजे. म्हणजे खाडिलकरांची नाट्यप्रकृतीच गंभीर होती, हे विधान जपून स्वीकारायचे आहे हे कळते. एकापाठोपाठ एक गंभीर नाटके कोसळल्यानंतर अगदी शेवटी खाडिलकर पुन्हा 'त्रिदंडी संन्यास' या नाट्याभ्यासाकडे वळले. याचीही नोंद घेतली पाहिजे. लोकमान्य टिळक जेलमध्ये असताना व सर्वत्र दडपशाहीचे वातावरण चालू असतानाच 'मानापमान' आणि गांधीजींची चळवळ ऐन जोम

७० / रंगविमर्श