या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दृष्टीने एक परंपरा म्हणून हे मत महत्त्वाचे आहे. अभिनवगुप्त-पूर्वकाळात रंगभूमी वैभवात असतांना प्राचीन टीकाकार नाट्यशास्त्राचा अर्थ कसा समजत त्यावर प्रकाश टाकणारे हे स्थल आहे. ह्या भूमिकेनुसार रस रंगभूमीवर नाट्यप्रयोगात असतो. नट अभिनय करतात, म्हणून रस अभिनय स्वरूप आहे. हा अभिनय, प्रेक्षकांच्यासाठी अनुभाव-विभाव आहे. त्यातील अनुभाव हे रसस्वरूप आहेत, हे मत भरत संमत आहे की, ते या अर्थाने भरत-संमत आहे की, नाट्यशास्त्रात त्याची नोंद आहे. ह्या अर्थाने भरत संमत नाही की त्या मताविरुद्ध जाणारी माहिती नाटयशास्त्रात प्राधान्याने आहे.
 राहुल आणि कीर्तिधरांची रसविषयक मते आज आपणांसमोर नाहीत. अभिनवगुप्तांनी राहुलांचा विचार नृत्याध्यायात केला आहे. कीर्तिधराचा विचार नृत्य, नांदी संगीत ह्या संदर्भात आहे. रत्नाकरांनीसुद्धा कीर्तिधराचा उल्लेख नृत्याच्या संदर्भातच केला आहे. अनुमानच करायचे तर असे करता येईल की ह्या टीकाकारांना अभिनय व संगीत यांचा विचार विस्ताराने करणे महत्त्वाचे वाटले.
 उद्भटाची स्थिती याहून भिन्न आहे. भामहाचा भाष्यकार म्हणून तो काव्यशास्त्रातील प्रसिद्ध अलंकारवादी आहे. नाट्यशास्त्राचाही तो प्रसिद्ध भाष्यकार आहे. अभिनवगुप्तांनी रस, हस्ताभिनय, रूपक प्रकार, वृत्ती, संधी, इत्यादी संदर्भात उद्भटाचे विचार नोंदविलेले आहेत. नाट्यशास्त्रातील शब्दाला बांधून न घेणारा, प्रसंगी भरताच्या ग्रंथाशी आपले मतभेद नोंदविणारा हा एक महत्त्वाचा भाष्यकार होता. काव्यशास्त्र व नाटयशास्त्राच्या परंपरा एकमेकांत मिसळण्यास जिथून आरंभ होतो त्याचे एक महत्त्वाचे ठिकाण उद्भट आहे. आज उद्भटाचा काव्यालंकार संग्रह तेवढा उपलब्ध आहे. भामहाला अनुसरून, काव्याचा विचार करताना उदभट रसाचा समावेश अलंकारात करतो. म्हणजे तो काव्याची शोभा अलंकारात मानतो, व ह्या शोभाकर बाबींच्या पैकी एक बाब रसही मानतो. उद्भट नाटयात रसाचे स्थान काय समजत होता हे सांगता येत नाही. अनुमान करायचे तर नाटयाच्या शोभाकरधर्माच्या पैकी तो एक रस समजत असावा असे म्हणावे लागेल, आणि ह्या भूमिकेला पुनः नाटयशास्त्रात आधार आहे. " नाटयाची शोभा” ही नाटयशास्त्रातील महत्त्वाची कल्पना आहे. काव्यात काव्याची शोभा पाहणारे, त्यानुसार शब्द, अर्थ, यमक, अनुप्रास गुण अलंकार यांच्यासह रसाचा विचार करणारे नाटयात नाटयाची शोभा पाहात असले पाहिजेत. त्यानुसार मुखराग, अंगसौष्ठव, अभिनयत्रय, गीत यांसह रसाचा विचार करीत असले पाहिजेत. नाटयसंग्रह म्हणजे शोभाकर घटकांची यादी ही कल्पना समोर ठेवून असा विचार करणे शक्य आहे. पण ही सगळी अनुमानं झाली.
 अभिनव भारतीच्या आधारे, दोन बाबी आपण नक्की सांगू शकतो. एक म्हणजे

११