या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



धात समजण्याची प्रथा नाट्यशास्त्रापासून आहे (२७।४२, ४३, ४५, इ.) ती लोल्लटासमोरही होती असे मानणे भाग आहे. नट फक्त काव्यनाटकातील रामांच्या पैकी एका रामाचे अनुकरण करू शकतो. ज्या नाटकाचा प्रयोग चालू असेल त्या नाटकातील राम ही प्रकृती अनुकार्य असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट काल्पनिक कथांची म्हणजे उह्य कथांची असते. तिथे अनुकरण करण्यासाठी लौकिक व्यक्ती अस्तित्वातच नसते. भवभूतीचे मालती-माधव लोल्लटासमोर असण्यास काहीच हरकत नाही. मूळ नाट्यशास्त्रातच अनेक रूपक प्रकार उह्य कथांचे आहेत. प्रकरण, प्रहसन, भाग इत्यादींना आधार काल्पनिक कथांचाच असतो. संस्कृत काव्यशास्त्राची गंमत ही आहे की विवेचन करताना अनेकजण अनुकार्य म्हणून काव्यगत प्रकृतीचा उल्लेख करतात पण आक्षेप घेताना ते लौकिक व्यक्तीला अनुकार्य समजतात.
 एक प्रश्न असा आहे की जेथे लिखित नाटक काव्य प्रयोगाला आधार नसते तिथे नट अनुकरण कुणाचे करणार ? हया प्रश्नाचे पहिले उत्तर हे आहे की नाट्यशास्त्र ज्या प्रयोगाची चर्चा करीत आहे ते नाटक काव्याचे म्हणजे अभिजात नाटकांचे प्रयोग आहेत. भूतकाळातील लोकनाट्यांच्या स्मृती व वर्तमान काळातील लोकनाट्याच्या परंपरेचे संस्कार नाट्यशास्त्रात दाखवता येतात, पण मुख्य चर्चा अभिजात नाट्यप्रयोगांची आहे. या प्रश्नाचे दुसरे उत्तर हे आहे की ज्या ठिकाणी नाटक काव्याचा आधार नसतो तिथेही इतिवृत्ताचे अनुकरण नट करतो. लौकिक व्यक्तीचे अनुकरण तो करू शकत नाही.
 लोल्लटांचे अनुकार्य काव्यगत प्रकृती आहे, हे एकदा स्पष्टपणे लक्षात घेतले म्हणजे लोल्लटाचा पक्ष लौकिकवादी आहे की अलौकिकवादी आहे ह्या चर्चेतला अर्धा आवेश कमी होतो. लोल्लटाला अनुकार्य म्हणून रसाचा आश्रय म्हणून जी काव्यगत प्रकृती अभिप्रेत आहे, ती देशकालनिबद्ध व मर्त्य अशी लौकिक व्यक्ती नव्हे. आता वाद फक्त ह्या काव्यगत प्रकृतीला लोल्लट अलौकिक मानतो काय इतकाच आहे.
 अनुकर्ता आणि अनुकार्य ह्या विभागणीचे रहस्य समजून न घेताच संस्कृत काव्य समीक्षेची भट्ट तोतानंतरची परंपरा विचार करीत आली आहे. लोल्लट व शंकुक यांच्यासमोर ही विभागणी स्पष्ट आहे. काव्यपरंपरेने विचार करण्याच्या समोर ह्या विभागणीचे महत्त्व फारसे नसावे हे स्वाभाविक आहे. पण ही विभागणी नीट समजून न घेतली तर नाटकाचा सुसंगत विचार करणे शक्य नाही. अभिनवगुप्तांच्या विवेचनात हा दुवा कच्चाच राहिलेला आहे. अनुकर्ता ही कल्पना तिच्या सर्व व्यापांसह समजून घेतली पाहिजे. फ़क्त दुष्यंताचे काम करणारा नटच अनुकर्ता नसतो तर शकुंतला, कण्व, गौतमी ही कामे करणारे नटही अनुकर्ते असतात. म्हणून सगळा नटवर्ग अनुकर्ता असतो. पण हे सचेतन माणसांपुरते झाले. दुष्यंत-शकुंतलेची


31