या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



नव्हे, भ्रम नव्हे, हा अलौकिक मुकुटही नव्हे. ते फक्त अनुकरण आहे. लोल्लटाच्या भुमिकेसाठी भ्रमविषयक पूर्वमीमांसेचे चिंतन आवश्यक नाही. प्रश्न आहे, नाटय अनुकरण रूप आहे का? ह्या प्रश्नाची चर्चा आपण भट्ट तोताच्या वेळी करू.
 लोल्लटावर एक आक्षेप असा आहे की, त्याने प्रेक्षकांना व रसिकांना नाटयाबाहेर ठेवले आहे. रसप्रतीती, रसनिर्मिती रसिक मत मानणे, एवढाच जर प्रेक्षक नाटयात सहभागी होणे ह्याचा अर्थ असेल, तर, लोल्लट रस सामाजिकनिष्ठ न मानता अनुकार्यगत मानत असल्यामुळे, हा आक्षेप रास्त मानता येईल. पण नाट्यशास्त्रात, ही कल्पना त्याहून निराळी आहे. एकीकडे नटाने परभावाचा स्वीकार करावयाचा आहे; ह्या स्वीकारासह अभिनय, व म्हणून अनुकरण आहे. दुसरीकडे प्रेक्षकांनी ह्या भावानुकरणात प्रवेश करावयाचा आहे; ह्या भावानुकरणातील प्रवेशामुळे प्रेक्षक तादात्म्य पावतात व रसाचा आस्वाद घेतात: नाटयशास्त्रात रस हा आस्वाद नसून, आस्वाद विषय म्हणजे आस्वाद्य आहे. लोलटाच्या भूमिकेत प्रेक्षकांना आस्वाद व तादात्म्य आहे; म्हणून त्याने प्रेक्षकांना नाटयाबाहेर टेवले, ह्या म्हणण्यात अर्थ नाही. फक्त प्रेक्षकांचा विचार लोल्लटाने सिद्धीच्या संदर्भात केलेला असावा.
  लोल्लटाच्या भूमिकेचे हे स्पष्टीकरण बारकाईने विचारात घेतले, तर असे दिसते की, लोल्लट अतिशय दक्षपणे नाटयशास्त्रातील वचनांना, विविध अध्यायातील भूमिकांना अनुसरत आहे व त्यातून एक सुसंगत भूमिका सिद्ध करत आहे. लोलटाच्या भूमिकेचे पहिले महत्त्व ह्यात आहे की, नाटयशास्त्राच्या सहाव्या आणि सातव्या अध्यायातील 'उत्पद्यते' ह्या शब्दाचा विपुल वापर. ह्या भूमिकेत, उपचार व औचित्य न होता, यथार्थ होतो. दुसरे म्हणजे, 'आस्वाद्यत्वात् ' ह्या शब्दप्रयोगाची संगती लागते. तिसरे म्हणजे, अनुभाव व अभिनय ह्यांतील फरक स्पष्ट होतो. चौथे म्हणजे, सिद्धी-अध्यायातील भावानुकरणाची संगती लागते. पाचवे म्हणजे ' स्थायी रसनाम लाभते' ह्या विधानाची संगती लागते. सहावे म्हणजे, नाटय अनुकरणरूप आहे ह्याची संगती लागते. थोडक्यात सांगायचे तर सर्व ग्रंथाची संगती जितक्या व्यवस्थितपणे लोल्लट लावतो, तितकी इतर कुणाच्याही भूमिकेत लावली जात नाही. म्हणूनच कांतिचंद्र पांडे, नगेंद्र, आदी अभ्यासक असे म्हणतातं की, लोल्लट भरताला अधिक जवळचा आहे. प्रमाण ग्रंथाचा आधार, नजरेआड केला तरी, काव्यातील भाव काव्यगत प्रकृतीचे आहेत, ही कल्पना महत्त्वाची आहे हे नाकारता येत नाही. लोल्लटाच्या पद्धतीने रससूत्राचा अर्थ असा आहे : रससूत्र अनुकार्यगतत्त्वाने रसाची उत्पत्ती सांगते. विभाव भावांना उत्पन्न करतात. विभाव-अनुभाव-व्यभिचारीभाव, हे स्थायीभाव पुष्ट करतात. अनुकार्यगत पुष्ट स्थायी म्हणजे रस. रससूत्रावर अधिक स्पष्टीकरण असे आहे : नाट्य प्रयोगात विभाव-अनुभाव-व्यभिचारी-स्थायी ह्यांचे अनुकरण करते. अनुकर्ता अनुसंधानबलपूर्वक समरस होऊन अनुकरणाशी प्रेक्षकांचे तादात्म्य असल्यामुळे


37