या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



अरण्य-पर्वत, जड आहेत. हीच विभागणी अनुभावात आहे. धैर्य-स्थैर्यादी काही अनुभाव चेतन आहेत; खेद-कंपादी काही अनुभाव जड आहेत. व्यभिचारीभावांच्या मध्ये काही व्यभिचारी चेतन आहेत, उदाहरणार्थ, निर्वेद; काही व्यभिचारीभाव जड आहेत. उदाहरणार्थ, व्याधी. स्थायीभाव सोडल्यास नाटयशास्त्रातील इतर भाव सारेच चित्तवृत्तिस्वरूप नाहीत, हे अस्पष्टपणे या लेखकांना जाणवलेले दिसते. ही जाणीव महत्त्वाची आहे. सुमारे ८०० वर्षानंतर ही जाणीव पुन्हा एकदा कै बेडेकरांना झाली. अजून एक महत्वाची कल्पना अशी आहे की, रसप्रतीती परस्थ असते. रस अनुकार्यगत म्हटल्यानंतर त्याची प्रतीती परस्थ मानणेच भाग आहे. ही प्रतीती नाट्यदर्पणकार परस्थ तर मानतातच, खेरीज ती परोक्षही मानतात. जर रसप्रतीती परस्थ असेल तर मग प्रेक्षकांना आनंद का होतो ? ह्याचे उत्तर, ह्या ग्रंथाप्रमाणे, नटाचे अनुभाव प्रेक्षकाच्या ठिकाणी भावजागृती करतात, हे आहे. हे उत्तर वाटते तितके उथळ नाही. मूळ प्रश्न वाड्मयातील भाव कुणाचे? हा आहे. ते अनुकार्याचे म्हटल्यावर रसप्रतीती परस्थ मानणे भाग आहे. रस पुष्टस्थायी म्हणजे चित्तवृत्ती स्वरूप असल्यामुळे इंद्रियग्राह्य नाही. म्हणून हे ज्ञान परोक्ष मानणेही भाग आहे. रसविवेचन करणाऱ्या सर्व प्राचीनांना कोणत्यातरी पद्धतीने हा मुद्दा स्वीकारावा लागला आहे.
  नाटयशास्त्रातील एक महत्त्वाची कल्पना अनुकरणाची आहे. ही कल्पना अनेक पदरी आहे, कवी जे लोकव्यवहाराचे अनुकरण करतो तो एक पदर आहे, नट प्रकृतीचेअनुकरण करतो, हा दुसरा पदर आहे. नटाला प्रकृतीचा परिचय नसल्यामुळे नटाचे अनुकरण लोकव्यवहाराकडे पाहून होते, हा तिसरा पदर आहे. अनुकर्ता अनुकार्याचे जे अनुकरण करतो, त्यातच लोकव्यवहाराचे अनुकरण गृहीत असते, ही महत्त्वाची कल्पना आहे. अभिनवगुप्तोत्तर काळात नाटय हे अनुकरण आहे असे आग्रहाने सांगणारे, नाट्यदर्पणकार आहेत. त्यांनी अतिशय सौम्यपणे भट्ट तोतकृत अनुकरणवादाचे खंडन वाया गेल्याचे दाखवून दिले आहे. अजून एक महत्त्वाची कल्पना विप्रलंभशृंगाराच्या बाबत आहे. नाट्यशास्त्रात करुण आणि विप्रलंभश्रुंगार यातील फरक सापेक्षभाव व निरपेक्षभाव असा दाखविलेला आहे. करुण हा निरपेक्षभाव आहे. नाट्य. दर्पणकार म्हणतात जेथे संभोगाचा मानसिक अनुवेद असतो, तो विप्रलंभशृंगार आहे. त्यानी सीताहरणानंतरचा रामचंद्राचा शोक विप्रलंभश्रुंगारात व सीतात्यागाचा शोक करुणरसात गृहीत धरला आहे. विप्रलभाचे करुणाहून हे निराळेपण मार्मिक आहे.
 लोल्लटाचा पुष्टिवाद, लौकिकपक्ष, अनुकरणवाद व उत्पत्तिवाद चालविणारे, अनेक मार्मिक सूचना देणारे, आज अनुपलब्ध असणारे अनेक उपरूपक प्रकार व नाटककार ह्यांचे उल्लेख करणारे नाट्यदर्पणकार एक लक्षणीय लेखक-युगुल म्हणून विचारात घेणे भाग आहे.


४१